कराड | जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाला दांडक्याने मारहाण करत असताना वाद सोडवण्यासाठी आलेल्या मध्यस्थ्यावरच कोयत्याने वार करण्यात आल्याची घटना कराड मध्ये घडली आहे. या हल्ल्यात एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात ७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्व संशयितांना ताब्यात घेतलं आहे.
अजय सावंत (वय 23, रा. शनिवार पेठ, कराड) असा हल्ल्यात जखमी झालेल्या फिर्यादीचे नाव आहे तर शुभम गोपाळ साळुंखे (वय 21), शशांक जालिंदर होगाडे (वय- 29), आकाश राजू वाघमारे (वय 22), रोहित मारुती होगाडे (वय 30), विनायक – विवेकानंद (वय 30, सर्व रा. शनिवार पेठ, कराड), यांच्यासह उर्फ सोन्या कार शिकलगार (वय 22, रा. मलकापूर, कराड) आणि एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वारुंजी येथील सह्याद्री हॉस्पिटल समोर जुन्या भांडणाच्या कारणावरून मंगळवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान हे सर्व संशयित हातात दांडके आणि कोयता घेऊन तयारीनिशीच आले होते. यावेळी त्यांनी फिर्यादीला थांबवून शिवीगाळ आणि दमदाटी करण्यास सुरुवात केली. यावेळी शशी होगाडे याने अविनाश कांबळे याच्या कानाखाली मारत याला मारा असे सांगितले. यानंतर विनायक होगाडे, सोन्या शिकलगार, शुभम साळुंखे, अक्षय वाघमारे व अल्पवयीन मुलाने अविनाश कांबळेला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी अजय सावंत हा वाद सोडवण्यास गेला असता शशी होगाडे व रोहित होगाडे यांनी सावंत याच्या डोक्यावर आणि पायावर खांद्यांवर कोयत्याने वार करत त्याला गंभीर जखमी केलं. याप्रकरणानंतर अजय सावंत याने सदर आरोपींविरोधात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी सर्व संशयतांना अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पी. एस. जाधव करत आहेत.