कराडला जागतिक दर्जाची यकृत प्रत्यारोपण सुविधा : कृष्णा अभिमत विद्यापीठ आणि नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलमध्ये सामंजस्य करार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाने नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटलसोबत यकृत प्रत्यारोपण कार्यक्रमासाठी सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार कराडमध्ये यकृत प्रत्यारोपणाच्या उपचारामध्ये सर्वोत्कृष्ट वैद्यकीय कौशल्य आणि अत्याधुनिक जागतिक दर्जाची तांत्रिक प्रगती आणणारा यशस्वी यकृत प्रत्यारोपण कार्यक्रम तयार करण्यासाठी या दोन्ही संस्था सहकार्य करतील आणि काम करतील. तसेच या सामंजस्य करारामुळे कराडसह आसपासच्या भागातील रुग्णांना जागतिक दर्जाची यकृत प्रत्यारोपण उपचार सुविधा उपलब्ध होणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर म्हणाले, आमच्या संस्थेत यकृत प्रत्यारोपण कार्यक्रम सुरू करण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्ससोबत जोडून घेताना आम्हाला आनंद होत आहे. या कार्यक्रमाद्वारे यकृताच्या जुनाट आजार आणि प्रत्यारोपणाच्या उपचारात बदल घडवून आणण्यासाठी आणि आमच्या वैद्यकीय सेवांना नवीन स्तरावर विकसित करण्यासाठी आम्ही तयार आहोत. अपोलो हॉस्पिटल्ससोबतची भागीदारी आम्हाला कराडसह आसपासच्या लोकांना सेवा देण्यासाठी आणि जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवेची जास्तीत जास्त सुलभता निर्माण करण्यास मदत करेल.

कृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृष्णा हॉस्पिटलने प्रारंभीपासूनच ग्रामीण भागातील रुग्णांना उच्च दर्जाच्या अत्याधुनिक आरोग्य सेवा माफक दरात देण्याचा प्रारंभ केला आहे. तसेच कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स डीम्ड युनिव्हर्सिटी या संस्थेने वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी बजावली आहे. आज सुमारे ११२५ बेडने सुसज्ज असलेल्या संस्थेच्या सुपरस्पेशालिटी केअर हॉस्पिटलमुळे दक्षिण महाराष्ट्रातील जनतेला मोठा आधार लाभला आहे. संस्थेला प्राप्त झालेली विविध मानांकने जसे की, एन.ए.बी.एच., एन.एन.एफ.आय. (एन.आय.सी.यु.), एन.ए.बी.एच (रक्तपेढी), एन.ए.बी.एल. (प्रयोगशाळा), आय.एस.ओ. ९००१:२०१५, आय.एस.ओ. १४००१ : २०१५ ही 14001: 2015, आयएसओ 14001: 2015 ही संस्था देत असलेल्या सर्वोत्कृष्ट सेवेची खात्री देतात.

कुशल डॉक्टर्स, सक्षम नर्सिंग कर्मचारी आणि कार्यक्षम सर्पोट स्टाफने सुसज्ज असलेले कृष्णा हॉस्पिटल उच्चदर्जाची आरोग्यसेवा प्रदान करते. कोविड-१९ विरुद्धच्या लढाईतही कृष्णा विद्यापीठ व कृष्णा हॉस्पिटलने अतुलनीय योगदान दिले असून, आर.टी.पी.सी.आर. चाचणीची सोय, प्लाझ्माफेरेसिस सुविधेसह ओपीडी आणि आयपीडी सेवा, डायलिसिस केअर आणि पोस्ट कोविड काळजीबाबत सल्लामसलत व उपचार सुविधा पुरविली. या काळात आम्ही आजपर्यंत ८४०० हून अधिक कोविड पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार केले, तसेच ११,००० पेक्षा जास्त लशींचे डोस देण्यात आले आहेत, असे डॉ. क्षीरसागर यांनी सांगितले.

भारतात यकृत रोगाच्या शेवटच्या टप्प्यात असलेल्या रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी दरवर्षी ३० हजारहून अधिक यकृत प्रत्यारोपणाची आवश्यकता असते. परंतु केवळ १५०० शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. यकृताच्या आजाराच्या रुग्णांच्या संख्येतही गेल्या दशकभरात मोठी वाढ झाली आहे. भारतात दरवर्षी अंदाजे २ लाख रुग्ण यकृत निकामी किंवा यकृताच्या कर्करोगाने मृत्युमुखी पडतात. त्यापैकी सुमारे १०-१५% वेळेवर यकृत प्रत्यारोपणाने वाचवता येतात. दोन संस्थांमधील सामंजस्य करारामुळे कराडमध्ये यकृत प्रत्यारोपण मोठ्या प्रमाणावर होईल. त्यामुळे जीव वाचतील आणि उपचारांसाठी इतर शहरे आणि राज्यांमध्ये जाण्याची गरज दूर होईल.

अपोलो हॉस्पिटल्सचे युनिट हेड संतोष मराठे म्हणाले, कृष्णा अभिमत विद्यापीठासोबतच्या सहकार्यामुळे या भागातील यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि यकृत उपचारांचा आयाम बदलेल आणि शेवटच्या टप्प्यातील यकृताच्या आजारामुळे गुंतागुंत असलेल्या रुग्णांना त्याचा फायदा होईल. आमचे आणि कराडमधील तज्ज्ञ यकृताचे आजार आणि प्रत्यारोपणामध्ये सर्वंकष काळजी प्रदान करतील. यकृत प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णांना खर्च आणि सुलभतेच्या दृष्टीनेही याचा फायदा होईल आणि त्यांना उपचारासाठी इतर शहरे आणि राज्यांमध्ये जावे लागणार नाही. महाराष्ट्रातील इतर ४ प्रमुख केंद्रांवरही अपोलो हॉस्पिटल्समार्फत यकृत प्रत्यारोपण कार्यक्रम चालविल जातो.

१९९८ मध्ये जागतिक दर्जाच्या आरोग्य सेवा प्रदान करणारे, भारतातील यशस्वी यकृत प्रत्यारोपण करणारे अपोलो हॉस्पिटल्स पहिले होते. अपोलो हॉस्पिटल्स यांनी पश्चिम भारतात १५० हून अधिक यकृत प्रत्यारोपण केले आहे आणि यकृत प्रत्यारोपणासाठी उत्कृष्ट केंद्र म्हणून ओळखले गेले आहे. आमच्याकडे अनेक वर्षांमध्ये यकृत प्रत्यारोपणाची चमत्कारिक प्रकरणे केलेल्या तज्ज्ञांची माहिती आणि टीम आहे. या सहकार्यामुळे आम्हाला आमच्या तज्ज्ञांकडून सर्वोत्तम गोष्टी कराडसह आसपासच्या लोकांपर्यंत पोहोचवण्याची आणि यकृत प्रत्यारोपणात सर्वोत्तम काळजी देण्याची संधी मिळेल, असे अपोलो हॉस्पिटलच्या यकृत प्रत्यारोपण आणि एचपीबी शस्त्रक्रिया विभागाचे सल्लागार डॉ. विक्रम राऊत यांनी सांगितले.

याप्रसंगी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कृष्णा हॉस्पिटलमधील डॉ. व्ही. सी. पाटील, डॉ. अपर्णा पतंगे, डॉ. हेमंत जानुगडे, डॉ. मनीषा लद्दड, डॉ. मकरंद माने, डॉ. आनंद गुडूर, वैशाली यादव, अपोलो हॉस्पिटलच्या डॉ. अमरीन सावंत, संजयकुमार सिंग, संदीप कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment