कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
गेल्या 5 वर्षांत सत्ताधाऱ्यांना कराड शेती उत्पन्न बाजार समितीचा ना नफा वाढविता आला; ना शेतकऱ्यांचे भले करता आले. सत्ताधाऱ्यांनी केवळ बाजार समितीला राजकारणाचा अड्डा बनविला, अशी प्रखर टीका कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांनी केली. शेतकरी विकास पॅनेलच्यावतीने नांदगाव (ता. कराड) येथील श्रीराज मंगल कार्यालयात आयोजित कराड दक्षिणमधील मतदार व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, माजी आमदार आनंदराव पाटील, ॲड. राजाभाऊ उंडाळकर, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. भोसले पुढे म्हणाले, बाजार समितीचा गेल्या वर्षातील नफा हा केवळ साडेतीन लाख रुपये आहे, तर प्रशासक आल्यावर मात्र नफ्यात वाढ झाल्याचे दिसून येते. जे सत्ताधारी बाजार समितीला नफा मिळवून देऊ शकत नाहीत, ते शेतकऱ्यांचे भले काय करणार? सोसायटी निर्माण करुन मतदार तयार करण्याचा आणि आपले सत्तास्थान अबाधित ठेवण्याचा प्रयत्न या लोकांनी दीर्घकाळ केला. सोसायटी गटात वर्चस्व ठेऊन बाजार समितीला राजकारणाचा अड्डा बनविण्याचे काम त्यांनी केले असून, अशा प्रवृत्तींना आता धडा शिकविण्याची गरज आहे. येत्या काळात शेतमालाला योग्य भाव मिळावा, कराडमध्ये उत्पादित होणाऱ्या शेतमालाला बाजारपेठ मिळवून देणे, तसेच बाजार समितीच्या माध्यमातून शेतीला चालना देण्यासाठी आणि शेतकरी व व्यापारी यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी एका स्वतंत्र फोरमची निर्मिती करण्याचा आमचा मानस आहे. यासाठी शेतकरी विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावे.
आ. पाटील म्हणाले, सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवित आहोत. ज्या काळात आमच्याकडे बाजार समिती होती, त्या ५ वर्षांच्या काळात आम्ही समितीचे उत्पन्न वाढविले. आपल्या येथे गूळ, हळद मोठ्या प्रमाणावर असताना इथल्या शेतकऱ्याला बाहेरच्या बाजारपेठेत का जावे लागते? उंब्रज, मसूर येथील उपबाजारांचा विकास करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी काय केले? याचे त्यांनी उत्तर द्यावे.
फळ प्रक्रिया करण्यासाठी ‘मॅग्नेट’ नावाचा प्रकल्प सुरु करण्यासाठी मी पणनमंत्री असताना राज्याच्या पणन विभागाकडून आपल्या कराडच्या बाजार समितीलाही पत्र पाठविले होते. पण निष्क्रिय सत्ताधाऱ्यांनी यासाठी प्रस्तावच दाखल न केल्याने, जवळपास 10 फळांवर प्रक्रिया करणारा प्रकल्प आपल्या कराडमध्ये येऊ शकला नाही. हा प्रकल्प झाला असता तर इथल्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा लाभ झाला असता. सत्ताधाऱ्यांकडे बोलण्यासाठी मुद्दे नसल्याने ते वैयक्तिक टीका करु लागले आहेत. त्यांच्यात खरंच हिंमत असेल तर त्यांनी बाजार समितीवर बोलावे, असे आव्हान आ. पाटील यांनी दिले.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, शेतीत नवे आधुनिक तंत्रज्ञान आणण्यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून प्रयत्न होणे गरजेचे आहे. वेअरहाऊसची कल्पना बाजार समितीने अंमलात आणली पाहिजे. देशातील सर्व मार्केट इथे येऊ शकते एवढी प्रगती आपल्या कराडच्या बाजार समितीच्या माध्यमातून होऊ शकते. ही नवी दिशा देण्यासाठी मतदारांनी शेतकरी विकास पॅनेलला निवडून द्यावे.
मदनराव मोहिते म्हणाले, बाजार समिती प्रगतीपथावर आणण्याची जबाबदारी आपली आहे. सहकारमंत्री असताना आ. बाळासाहेब पाटील यांनी सहकार खाते उत्तमपणे सांभाळले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाजार समितीचा विकास सक्षमपणे होईल, याची मला खात्री वाटते. त्यामुळे मतदारांनी शेतकरी विकास पॅनेलला विजयी करावे.
यावेळी माजी आमदार आनंदराव पाटील, ॲड. राजाभाऊ उंडाळकर यांचीही भाषणे झाली. मेळाव्याला कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील, बाजीराव निकम, वसंतराव शिंदे, सयाजी यादव, धोंडिराम जाधव, श्रीरंग देसाई, दत्तात्रय देसाई, माजी जि. प. सदस्य गणपतराव हुलवान, आर. टी. स्वामी, पैलवान आनंदराव मोहिते, मानसिंगराव जगदाळे, सौ. रेखाताई पवार, फिरोज इनामदार, मानसिंग पाटील, संतोष पाटील, पैलवान धनंजय पाटील, माणिकराव जाधव, शिवाजीराव थोरात, ॲड. आत्माराम पाटील, प्रदीप जाधव, गजेंद्र पाटील, संपतराव थोरात, डॉ. सुरेश सुकरे, संजय शेवाळे आदींसह उमेदवार, मतदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिलीपराव पाटील यांनी स्वागत केले. सरपंच हंबीरराव पाटील यांनी प्रास्तविक केले. डॉ. सुशांत मोहिते यांनी आभार मानले.
‘त्यांनी’ एखादी पानपट्टी तरी काढली का?
उमेदवार पैलवान आनंदराव मोहिते म्हणाले, की बाजार समितीची सत्ता इतकी वर्षे ताब्यात असतानाही सत्ताधारी मंडळी त्यांच्या कारभाराबाबत बोलण्यापेक्षा भोसले व पाटील कुटुंबावर नाहक टीका करत आहेत. खरंतर सहकारात उत्तुंग काम केलेल्या या कुटुंबांवर बोलण्याचा कोणताही नैतिक हक्क मंडळींना नाही. कारण ज्यांनी आमदारकी, खासदारकी आणि मुख्यमंत्रीपद भोगले अशांनी सहकारात एखादी संस्था काढायचे राहू दे, निदान एखादी पानपट्टी तरी काढली का? याचे उत्तर द्यावे, अशी टीका त्यांनी केली.