कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सगळीकडे कोरोनाने हाहाकार माजला आहे. या परिस्थितीत बाधित रुग्णाची व त्याच्या कुटुंबीयांची मानसिक व आर्थिक दृष्ट्या मोठी कुचंबणा होत असते. कोरोना बाधितांचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकांना हॉस्पिटलचे बिल भागवताना मोठी कसरत करावी लागते. अशावेळी मृत कोरोना रुग्णाच्या अंत्यसंस्कारसाठी नातेवाईकांना पैसे मोजावे लागतात, हि बाब अत्यंत निर्दयी आहे. कोरोना बाधितांचे नातेवाईक कुटुंबीय आधीच मानसिक दृष्ट्या ढासळलेले असतात. अशा परिस्थितीत नगरपालिकेने अंत्यसंस्कारासाठी कोणतेही पैसे आकारू नये, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी निवेदनाद्वारे कराड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडे केली आहे. यावेळी निवेदन देताना त्यांच्यासोबत जावेद शेख उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले कि, कोरोना बाधितांचे निधन झाल्यानंतर त्यांचे कुटुंबिय व नातेवाईक आर्थिकदृष्ट्या व मानसिक दृष्ट्या खचलेले असतात. त्यांना त्यांचा व्यक्ती जरी वाचू शकला नसला तरी त्याच्या उपचारासाठी जे हॉस्पिटलचे बिल आलेले आहे ते भागविण्यासाठी मोठी कसरत त्या कुटुंबाला करावी लागते. कोरोना बाधिताला कोरोना रिपोर्ट आल्यापासून प्रत्येक गोष्टीला पैसे मोजावे लागत असल्याने तो व त्याचे कुटुंबीय खचत चाललेले असतात. अश्या परिस्थितीत मृत कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नगरपालिकेला पैसे भरावे लागतात.
यासाठी मी निवेदनाद्वारे मागणी केली आहे कि, नगरपालिकेने अंत्यसंस्कारासाठी कोणतेही शुल्क आकारू नये. आपल्या शहरा शेजारील मलकापूर नगरपरिषद व सातारा नगरपालिका कडून अंत्यसंस्कार साठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तर अशा परिस्थितीत कराड नगरपालिके सारख्या जुन्या व सक्षम नगरपालिकेने सामान्य जनतेचा विचार करून अंत्यसंस्कारसाठी कोणतेही शुल्क आकारू नये, अशी आम्हां युवक काँग्रेसच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे. सद्या कराड शहरातील व्यक्तींकडून कोणतेही शुल्क आकारले जात नसले, तरी शहराबाहेरील व्यक्तीकडून आकारले जात आहे. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाला अंत्यसंस्कारासाठी कराड नगरपरिषदेकडे पाठविले जाते व अशाकडून नगरपालिका जे शुल्क आकारते ते आकारले जाऊ नये अशी आमची निवेदनांद्वारे मागणी आहे.