कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
घरकुलासाठी प्रस्ताव दिला, पालिकेच्या यादीत नाव आले अन् पालिकेने पैसैही दिले. महिलेने घर उभे केले अन् पालिकेची नोटीस आली. तुम्ही लाभार्थी नाही, पैसै परत द्या. चूक आमची पण तीन दिवसात पैसै दिले नाहीतर फाैजदारी कारवाई करण्याची धमकी कराड पालिकेच्या प्रशासनाने एका महिलेला दिली आहे. या पालिकेच्या हुकुमशाही कारभारा विरोधात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी थेट सातारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे धाव घेतली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कराड येथील शनिवार पेठ मुजावर काॅलनी मधील सर्व सामान्य कुटुंबातील रहिवासी नफिसा नुरअहमद शेख या महिलेने पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरकुल मिळावे म्हणून कराड नगरपरिषद येथे प्रस्ताव दाखल केला होता. सदर योजना अंतर्गत शेख यांना नगरपालिकेकडून सुरुवातीला एक लाख रुपये देण्यात आले. यामुळे त्यांनी योजनेतील रक्कम तुटपुंजी असल्याने पै पाहुणे व बँक प्रकरण द्वारा काही रक्कम असे घर बांधणीचे काम सुरू केले. काही महिन्यांत घराचे फाऊंडेशन व काॅलम उभारणी झाली. सदर रक्कम दिल्याच्या सहा महिन्यानंतर कराड नगरपालिकेमधुन नोटीस आली. तुमचे नाव लाभार्थी योजना यादीत नसून तुम्हास नगरपालिकेकडून नजरचुकीने आवास योजनेसाठी एक लाख रुपये मिळाले आहेत. येत्या तीन दिवसात पैसे परत करा. अन्यथा आपणा विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
अचानक मिळालेल्या नोटीसीमुळे मानसिक त्रास होऊन अर्जदार यांचे आईंना धसकाच बसला. यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी ॲडमिट करावे लागले, सदर हवालदिल कुटुंब पैसे कुठून देणार..? निवारा या मूलभूत सुविधा पासुन वंचित राहणार..? कराड नगरपालिकेच्या अजब गजब काम काजाची माहिती व सदर कुटुंबावर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सदस्य नवाज सुतार यांनी थेट सातारा जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी रुचेश जयवंशी यांच्याकडे धाव घेऊन सदर हकिकत सांगुन सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सदर कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, अशी फसवणूक अनेकांची झाली असावी. त्यांना हि दिलासा द्यावा व नगरपालिकेच्या भोंगळ कारभाराची चौकशी व्हावी. तसेच जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, असे निवेदन दिले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे सातारा जिल्हा अध्यक्ष रफीकभाई शेख, गोटे ग्रामपंचायत सदस्य ॲड. साबिरभाई मुल्ला, साथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कय्युम मुल्ला, हिमालय फाउंडेशनचे सचिव जाविद पटेल उपस्थित होते.