कराड | दहा कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे अमिष दाखवून व्यावसायिकाला 10 लाख 75 हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. याबाबत कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील नरसिंगराव रामराव गायकवाड यांनी कराड तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून राहुल प्रजापती (रा. मुंबई), विनायक श्रीकृष्ण पळसुले (रा. वडगाव बुद्रुक) यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रेठरे बुद्रुक येथील नरसिंगराव गायकवाड यांना पाटण तालुक्यातील चाफेर आणि काहेर याठिकाणी रियल इस्टेट प्रोजेक्ट स्थापन करायचा होता. त्यासाठी त्यांना कर्जाची गरज होती. त्याबाबत त्यांनी विनायक पळसुले याला सांगितल्यानंतर त्याच्या माध्यमातून मुंबईतील राहुल प्रजापतीसह अन्य काही जणांशी त्यांची ओळख झाली. संबंधितांनी त्यांना दहा कोटी रुपयांचे कर्ज देतो, असे सांगितले.
मात्र, त्यासाठी वेगवेगळ्या कारणास्तव त्यांनी नरसिंगराव गायकवाड यांच्याकडून 11 लाख 75 हजार 996 रुपये घेतले. त्यापैकी एक लाख रुपये त्यांनी परत दिले. मात्र उर्वरित 10 लाख 75 हजार रुपये परत न देता गायकवाड यांची फसवणूक केली. याबाबतचा गुन्हा कराड तालुका पोलीस ठाण्यात दाखल झालाय. पोलीस उपनिरीक्षक आशिष जाधव तपास करत आहेत.