हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सुमारे 36 वर्षांपूर्वी एका खुनातील फरार आरोपीस अटक करण्यात कराड पोलिसांना अखेर यश आलं आहे. सन 1983 साली कराड तालुक्यातील पाल येथे कोयता, कुऱ्हाडीने खून करून मनव येथील एकजण फरार झाला होता. तो गणपती विसर्जनासाठी आपल्या घरी आला. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी मध्यरात्रीच सापळा रचून त्याला अटक केली.
लाला सिद्ध्राम तेली (रा. मनव, ता. कराड) असे अटक करण्यात आलेल्या फरार आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाल (ता. कराड) येथे 36 वर्षापूर्वी खून करून फरार असलेल्या एका संशयितास पोलिसांनी पकडले. खूनाचा बदला घेण्यासाठी 1983 साली एकाचा कोयता, कुऱ्हाडीने खून करण्याता आला होता. लाला सिद्ध्राम तेली असे संशयित आरोपीचे नाव असून, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांना खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यास पकडण्यात आले. या प्रकरणात संपत सिद्ध्राम तेली, महादेव सिद्ध्राम तेली, दत्तू अण्णा तेली, लाला सिद्ध्राम तेली (सर्व रा. मनव, ता. कराड) अशी खूनातील संशयितांची नावे आहेत.
भीमराव सिद्धाम तेली (रा. मनव, ता. कराड) याचा त्याच गावातील बाळू सरगर, दत्तू यलमारे वगैरे लोकांनी 1983 मध्ये खून केलेला होता. त्याचा बदला म्हणून लाला सिद्ध्राम तेली, संपत सिद्ध्राम तेली, महादेव सिद्ध्राम तेली व दत्तू अण्णा तेली यांनी दत्तू ज्ञानू यलमारे (रा. पाल, ता. कराड) याचा निर्घृण खून केला होता. त्याबाबत उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. गुन्ह्यातील संशयित लाला सिद्ध्राम तेली हा गुन्हा घडल्यापासून 36 वर्ष फरार होता.
कराड शहरात गणेशोत्सव बंदोबस्तकरिता हजर असताना अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांना खबऱ्यामार्फत लाला सिद्धाम तेली हा त्याचे राहते घरी आलेला आहे, अशी माहिती मिळाली. त्यानंतर बापू बांगर यांनी पोलिस उपनिरीक्षक विश्वास कडव यांचे पथकास त्याचा शोध घेऊन खात्री ताब्यात घेऊन संबंधित पोलिस ठाणेस हजर करण्याबाबत सूचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने मनव येथे जाऊन सापळा लावून संशयितास त्याचे राहते घरातून मध्यरात्रीचे सुमारास शिताफीने पकडून पुढील कार्यवाहीसाठी उंब्रज पोलिस ठाणे येथे हजर केले.