कराड | ओगलेवाडी (ता. कराड) येथील प्रितम बिअर शॉपीमध्ये मंगळवारी दि. 26 रोजी दुपारी 2 च्या सुमारास बिअरच्या बाटलीचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन चिडून चौघांनी बिअर शॉपी मालकाला शिविगाळ, दमदाटी करीत त्याच्या डोक्यात बिटरची बाटली फोडली. तसेच काऊंटर, कुलरसह इतर साहित्याचे नुकसान केले. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कराड पोलिसांनी अभिजित जगन्नाथ मुळीक (रा. ओगलेवाडी, ता. कराड) याच्यासह अनोळखी तिघे असे एकूण चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तर संदीप हिंदुराव पवार (रा. हजारमाची, ता. कराड) असे जखमीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, हजारमाची येथील संदीप पवार यांची ओगलेवाडी येथे बिअर शॉपी आहे. मंगळवारी दुपारी संदीप पवार हे शॉपीमध्ये असताना अनोळखी तिघेजण त्याठिकाणी आले. त्यांनी मद्यप्राशन केले होते. शॉपीमध्ये आल्यानंतर त्यांनी संदीप पवार यांना बिअर मागितली. ती बिअर संपविल्यानंतर पवार यांनी त्यांच्याकडे बिअरचे पैसे मागीतले. त्यावेळी त्या तिघांनी पैसे देण्यास नकार देऊन पवार यांना शिविगाळ, दमदाटी केली. त्याचवेळी अभिजीत मुळीक त्याठिकाणी आला. त्याने बिअरची बाटली उचलून पवार यांच्या डोक्यात मारली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर चौघेही तेथुन पळून गेले. याबाबत संदीप पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.