कराड | जिल्हा बँकेच्या पार्श्वभूमीवर सोसायटी गटातून संभाव्य उमेदवार असलेले अँड. उदयसिंह पाटील यांच्या भेटीला छ. उदयनराजे भोसले सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पोहोचले. कराड येथील खरेदी विक्री संघाच्या मुख्य कार्यालयात जवळपास दीड ते दोन तास अँड. उदयसिंह पाटील व उदयनराजे भोसले या दोघांच्यात कमराबंद चर्चा झाली.
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील व उदयसिंह पाटील या दोघांनीही सोसायटी गटातून अर्ज भरलेले आहेत. तर गृहनिर्माणमधून सहकारमंत्री यांचे बंधू जयंत पाटील यांचा अर्ज दाखल करण्यात आला असून याच मतदार संघातून छ. उदयनराजे भोसले यांचाही अर्ज असल्याने या भेटीला मोठे महत्व आहे. यावेळी उदयनराजे भोसले यांच्या सोबत शरद काटकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, नगरसेवक हणमंतराव पवार तर उदयसिंह पाटील यांच्यासोबत जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन हणमंतराव चव्हाण, प्रा. धनाजी काटकर आदी उपस्थित होते.
कराड येथे सोमवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास छ. उदयनराजे भोसले यांनी काँग्रेसचे मोठे नेते पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली आहे. तर नंतर तासाभरात काॅंग्रेसचेच अँड. उदयसिंह पाटील यांचीही भेट घेतल्याने कराडसह जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र कराडमधील सोसायटी गट व गृहनिर्माण मतदार संघाबाबत चर्चा झाली असल्याने सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत आता चांगलीच रंगत पहायला मिळणार असे दिसू लागले आहे.