कराडकरांची चिंता वाढली! आणखी २ जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड येथील कृष्णा हॉस्पीटल मध्ये उपचार घेत असलेल्या दोन संशियंतांचे रिपोर्टा आज पॉझिटिव्ह आले आहेत. कराड तालुक्यातील दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांच्या संपर्कात असलेल्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे आता समोर आले आहे. 38 पुरुष व 25 वर्षीय युवकाला कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे कोरोना बाधिताच्या निकट सहवासित म्हणून विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. या दोघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून हे दोघेही कोरोना बाधित (कोविड-19) असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे. 

ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्हयात कोरोनाबाधितांची संख्या १६ वर पोहोचली आहे. तर यातील कराड तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या ८ वर गेली आहे. जिल्ह्यातील अर्धे रुग्ण हे कराड तालुक्यातील असल्याने आता कराडकरांसाठी चिंता वाढली आहे. या दोन कोरोनाबाधित रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नियमानुसार निगराणीखाली उपचार सुरु आहेत. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 1 अनुमानित निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 19, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे 13, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 14, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथे 13, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथे 9 असे एकूण 68 नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

तसेच काल मृत्यू झालेल्या दोन कोरोनासंशयीतांचा अहवाल आज निगेटीव्ह आला आहे. त्यांना सारी सदृश आजाराची लक्षणे असल्याचे बोलले जात होते. मात्र प्राप्त अहवालातून याबाबत चित्र स्पष्ट झाले असून सदर दोन व्यक्तींचा मृत्यू हा घशातील जंतूसंसर्गाने झाल्याचे सांगण्यात आले आहे. आज नव्याने सापडलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तीचा प्रशासन शोध घेत असून नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.