कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला कराडला शासकीय जागेतील झाडांवर विनापरवाना कुऱ्हाड चालविण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक असलेली परवानगी घेतली नसल्याने बांधकाम विभागानेही या वृक्षतोडीचा खुलासा मागितला असल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.
कराड शहरात असणाऱ्या नगरपालिकेच्या हद्दीतील जुन्या तहसील कार्यालया समोरची झाडे विना परवानगी तोडल्याने पर्यावरण प्रेमींच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे. उद्या शनिवार 5 जून हा पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो. मात्र पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येलाच शासकीय जागेतील झाडे विनापरवाना तोडण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.
कराड- तासगाव मार्गावरील मार्केट यार्ड परिसरात शासकीय जागा असून तेथे जुने तहसील कार्यालयासह, कोर्ट, पुरवठा विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तसेच काही दिवस कराड तालुका पोलिस स्टेशनचे या इमारतीत कामकाज चालत होते. सध्या केवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कामकाज चालत असते. या परिसरात बऱ्यापैकी झाडे आहेत, त्याच्यावर कुऱ्हाड चालविण्यात आलेली आहे.
लेखी परवानगी नाही, कारवाईचे आदेश : मुख्याधिकारी
तेथे झाडे तोडण्यासाठी लेखी परवानगी नाही. नगराध्यांक्षानी कागदावर परवानगी दिली आहे परंतु लेखी आदेश नाही. बांधकाम विभागाला आवाहल सादर करण्यास सांगितले आहे. केवळ छाटणी असेल तर माझ्या आदेशावर चालते, परंतु मुळापासून झाडे तोडल्याने बाधकाम विभागाला खुलासा मागितला असल्याचे नगरपालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी सांगितले.