कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
संततधार पाऊस व कोयना धरणातुन सोडलेल्या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सध्या कराडच्या कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून नदीचे पाणी हळूहळू कराड शहरात वाढू लागले आहे. परिणामी संभाव्य पुराचा धोका ओळखून कराड पालिकेच्यावतीने कराडमधील पाटण कॉलनी येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या 150 कुठुंबियांचे पालिकेच्या शाळेत सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र, तेथेही त्यांना गळक्या खोल्यांचा आसरा घ्यावा लागत आहे.
गेल्या काही दिवसांपासून कराड-पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे कोयना- कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामध्ये आज कोयना धरणातून दोनदा पाण्याचा विसर्ग करण्यात आला असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्यावतीने देण्यात आला आहे. कोयना नदीचे पाणी पुढे कृष्णा नदीला मिळाले कि या नदीचे पाणी कराड शहरातील काही सखोल भागात शिरते. मागील दोन वर्षांपूर्वी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे कराड शहरात पुराचे पाणी शिरले होते.
यावर्षी त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पुराच्या संभाव्य भितीने कराड शहरातील पुररेषेत असलेल्या पाटण कॉलनी मधील झोपडपट्टीतील 150 कुठुंबियांचे कराड नगरपालिका शाळेत स्थलांतर करण्यात आले आहे. मात्र, स्थलांतर केलेल्या जागेतही या कुटुंबियांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या शाळेच्या गळक्या खोल्यामध्ये खाली भांडी ठेऊन हे नागरिक राहत असुन आमची कायमस्वरुपी सोय करावी, अशी मागणी केली जात आहे.