कराड | स्वरनिर्झरच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष व स्वरनिर्झर संगीत अकादमीच्या वर्षपूर्ती निमित्त उद्या बुधवार दि. 20 एप्रिल रोजी संगीत मैफिलीचे आयोजन केले असल्याची माहिती स्वरनिर्झर संगीत अकादमीच्या अध्यक्षा सौ. अलापिनी सागर जोशी यांनी दिली. कै. स्वरगंधा टिळक यांनी सन 1970 साली स्थापन केलेल्या स्वरनिर्झर संस्थेच्या 50 व्या म्हणजे सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त व स्वरनिर्झर संगीत अकादमीच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., कराडच्या मुख्य कार्यालय इमारतीमध्ये सायं. 6 वाजता संगीत मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये संगीत मैफिलीच्या पहिल्या पुष्पामध्ये सौ. अलापिनी जोशी यांचे शास्त्रीय गायन होणार असून त्यास योगेश रामदास यांचे वादिनी साथ, चैतन्य देशपांडे यांची तबला वादन साथ मिळणार आहे. तसेच प्रसिद्ध तबला वादक यशवंत वैष्णव यांचा एकल तबला वादनाचा कार्यक्रम होणार असून योगेश रामदास हे त्यांना लेहेरा साथ देणार आहेत.
स्वरनिर्झरच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष व स्वरनिर्झर संगीत अकादमीच्या वर्षपूर्ती निमित्त सन 2022 मध्ये कराड शहरवासियांसाठी विविध प्रकारचे कार्यक्रमांचे आयोजन करणार आहे. यामध्ये प्रस्थापित तसेच उगवते कलाकारांना आमंत्रित करणार असून शास्त्रीय संगीताचा प्रसार व्हावा याउद्देशाने अनेक शिबीरे, कार्यशाळा, स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.