कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे खंड पडलेला कराडकरांचा उत्सव असलेली शिवजयंती महोत्सव, दरबार मिरवणूक हजारोंच्या उपस्थित पार पडली. दरबार मिरवणूकीत हिंदुत्वाचा जागर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज की जय…, तुमचं आमचं नातं काय… जय भवानी जय शिवराय, जय भवानी… जय शिवाजी, कसलं वादळ… भगवं वादळ… जय श्रीराम या घोषणांनी सारे कराड शहर दणाणुन गेले. यावेळी सर्वधर्मातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
पारंपारीक शिवजयंतीनिमीत्त शहरातुन घोडे, चित्ररथ, वाद्ये, तुताऱ्यांच्या ललकारीत महिला, नागरीक, युवक, युवतींच्या उपस्थितीत भव्य मिरवणुक काढण्यात आली. यंदाच्या मिरवणुकीत तरुणांचा मोठा जोश दिसुन आला. येथील पांढरीच्या मारुती मंदिरापासुन सायंकाळी सातनंतर मिरवणुकीस पालखी पुजनाने हिंदु एकता आंदोलनाचे विनायक पावसकर, विक्रम पावसकर, अतुल भोसले, सौरभ पाटील, जयवंत पाटील, अतुल शिंदे, हणमंतराव पवार, विद्या पावसकर, स्मिता हुलवान, मुकुंद चरेगावकर, फारुख पटवेकर, मजहर कागदी यांच्यासह माजी नगरसेवक व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला.
मिरवणुकीत पारंपारीक वेशभुषा परिधान करुन घोड्यावर स्वार झालेले युवक, युवती, महिला, वाद्ये, घोडी, नागरीक, महिला, तरुण- तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीत हनुमानाची वेशभुषा केलेला कलाकार सहभागी झाले होते. धिप्पाड शरीयष्टीच्या हनुमानाने सर्व मिरवणुकीचे लक्ष वेधले. युवक, युवतींसह बालगोपाळांचे मिरवणुकीतील ते आकर्षण ठरले. मिरवणुक पांढरीच्या मारुती मंदिरापासुन कन्याशाळेसमोरुन, चावडी चौक, आझाद चौक, दत्त चौकात नेण्यात आली. तेथे मिरवणुकीचा समारोप झाला.
भाजप नेते आशीष शेलार यांची उपस्थिती
शिवजयंतीच्या पार्श्वभुमीवर काढण्यात आलेल्या मिरवणुकीतील एका उंच वाहनात भाजपचे विक्रम पावसकर यांच्या समवेत भाजपचे खासदार रणजितसींह नाईक-निंबाळकर, भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांच्यासह मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी आमदार शेलार यांनी जोरदार घोषणाही दिल्या. त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले.