कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड येथील स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयात ठेकेदाराकडून निकृष्ठ दर्जाचे जेवण दिले जात आहे. तेव्हा रूग्णांच्या जेवणात भ्रष्टाचार करणाऱ्या वैद्यकीय अधिक्षक प्रकाश शिंदे आणि ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी भिमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांनी केली आहे.
कराड येथे रूग्णालयाच्या बाहेर भिमशक्ती सामाजिक संघटनेकडून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनास काॅंग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, भीम आर्मीचे जावेद नायकवडी, संतोष मोहिते, आयुब शेख, संतोष थोरवडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आनंदराव लादे म्हणाले, रूग्णालयात दिले जात असलेले पूर्णपणे चुकीच्या पध्दतीने दिले जात आहे. शासनाच्या नियमानप्रमाणे जो आहार मिळाला पाहिजे, तो दिला जात नाही. गरोदर महिलांना वेगळे जेवणे दिले जाते. त्यामध्ये अंडी व फळांचा समावेश असतो, परंतु तो आहार दिला जात नाही. गेले अनेक वर्ष पाठपुरावा करत आहोत. महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी म्हेत्रे हा ठेकेदार असून त्याच्याविरोधात तक्रारीही आहेत. तरीही पुन्हा त्यालाच ठेका दिला जात आहे.
झाकीर पठाण म्हणाले, आज भीमशक्ती संघटनेकडून पोषण आहातील निकृष्ठ दर्जा व भ्रष्टाचारबाबत आंदोलन पुकारले आहे. तेव्हा या आंदोलनास आम्ही अल्पसंख्याक विभागाचा पाठिंबा देत आहोत. या सर्व गोष्टीवर जिल्हाधिकारी यांनी लक्ष द्यावे. तसेच या आरोपाची शहनिशा करावी आणि त्यामध्ये तथ्य असेल तर अशा ठेकेदारावर आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.