कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सहकाराचे किर्तीस्तंभ स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पदस्पर्शाने पावन भूमीत, ऐतिहासिक कराड नगरीत ऑडीटर्स कौन्सिल अँड वेलफेअर असोसिएशनच्यावतीने महाराष्ट्रातील पहिले राज्यस्तरीय लेखापरिक्षक अधिवेशन व कार्यशाळा 21 व 22 मे रोजी कराड अर्बन बँकेच्या सभागृहात होत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामदास शिर्के यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी उमेश देवकर, संदीप नगरकर, श्रीकांत चौगुले, आबासाहेब देशमुख, दत्तात्रय पवार, बाळासाहेब वाघ, संपत शिंदे, संगिता भोसले, सूचित्रा नलवडे, उमेश मोहिते, कमलेश पाचपूते, अनिल नायर, प्रशांत शिर्के, हणमंत पाटील,तसेच सर्व पदाधिकारी व सर्व सहयोगी जिल्हा संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
राज्यात सूमारे सव्वादोन लाख सहकारी संस्था आहेत. सरकारने काही दिवसांपूर्वी घटना दूरूस्तीसह सहकारी कायद्यात बदल करुन नविन मसुदा तयार केला असल्याचे सांगून शिर्के म्हणाले बदलेल्या नियमांमुळे लेखापरीक्षकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. लेखापरिक्षणात अनेक अडचणी येणार असल्याने सरकारने तयार केलेला नविन मसुद्यावर या अधिवेशनात चर्चा व त्यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच बदलेल्या कायद्यांबाबतही या कार्यशाळेत तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. ऑडीटर्स कौन्सिल अँड वेलफेअर असोसिएशनचे अधिवेशन हे कराडला होत आहे. कराडातूनच आमच्या चळवळीला बळ मिळेल या उद्देशाने या अधिवेशनाचे आयोजन कराडला करण्यात आल्याचे शिर्के यांनी सांगितले.