कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमच्या वतीने कराडमध्ये इनरव्हील महिला महोत्सव कराड 2022 चे आयोजन करण्यात आले आहे. महिलांना एकत्र करून त्यांच्यातील विविध कौशल्यांना वाव मिळावा, हा या महिला महोत्सवाचा हेतू आहे. कराड मधील हा पहिलाच महिला महोत्सव आहे. यामध्ये महिलांच्या साठी विविध स्पर्धा, पुरस्कार, स्त्री सन्मान सोहळा, व आकर्षक बक्षिसे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे.
महिलांसाठी चित्रकला स्पर्धा व त्या चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. स्वादिष्ट कटलेट व पौष्टिक सूप या पदार्थांची पाककला स्पर्धा आयोजित केली आहे. तसेच मेहंदी स्पर्धा, फॅशन स्पर्धा यामध्ये वेस्टर्न, मिस मॅच व रेट्रो थीमवर या स्पर्धांचे आयोजन केले आहे. मोबाईल मधील फोटोग्राफी स्पर्धा कृष्णामाई घाट, कराड या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. तसेच महिलांसाठी डान्स स्पर्धेचे सुद्धा आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये सर्व स्पर्धांना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर या महोत्सवामध्ये महिलाच्या प्रगतीसाठी काम करणाऱ्या स्त्रीला जिजाऊ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
शनिवार, रविवार दि. 17 व 18 सप्टेंबर रोजी दोन दिवस हा महिला महोत्सव कराड येथील वेणूताई चव्हाण सभागृह याठिकाणी संपन्न होणार आहे. महिलांच्या विविध गुणांना वाव देण्यासाठी हा महोत्सव एक उत्तम व्यासपीठ असणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी संख्येने या महोत्सवांमधील स्पर्धांमध्ये तसेच कार्यक्रम पाहण्यासाठी सहभागी होऊन आनंद घ्यावा, असे आवाहन क्लबच्या वतीने महोत्सव कमिटी चेअरमन छाया पवार व को- चेअरमन माहेश्वरी जाधव यांनी केले आहे.