कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील ग्रामीण भागामधील उमेद अभियान अंतर्गत असलेल्या बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवण्याच्या अनुषंगाने व प्रोत्साहन देण्यासाठी नाविण्यपूर्ण अशा कराडच्या जत्रेचे आयोजन दि. 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी करण्यात आले आहे. कराड येथील बैल बाजार मैदान, शेती उत्पन्न बाजार समिती येथे उमेद- तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, कराड पंचायत समिती व ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्था ओंड यांच्या वतीने या कराडच्या जत्रेत 100 स्टॉल मधून घरगुती व दर्जेदार उत्पादने खरेदी करण्याची संधी कराडकरांना उपलब्ध होणार असल्याची माहिती कराड पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी दिली.
यावेळी ज्ञानदीप राष्ट्रीय सामाजिक व शैक्षणिक विकास संस्थेचे अध्यक्ष आनंदा थोरात, सहाय्यक गटविकास अधिकारी विजय विभुते, उमेद तालुका अभियान व्यवस्थापक निलेश पवार यांची उपस्थिती होती. उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत कराड तालुक्यात 3 हजार 234 महिला स्वयंसहाय्यता समूहाचे माध्यमातून 32 हजाराहून अधिक महिलांचे संघटन झाले आहे. ग्रामीण भागातील निराधार, एकल, परित्यक्ता, विधवा, दिव्यांग यासह वंचित घटकातील कुटुंबातील महिलांना स्वयंसहाय्यता समुहांचे माध्यमातून पाठबळ आणि प्रोत्साहन मिळत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार समूहाची संस्था बांधणी, क्षमता बांधणी, कर्ज अर्थसहाय्य, वित्तीय व आर्थिक समावेशन, रोजगार व स्वयंरोजगार प्रशिक्षणामधून महिलांना नवउद्योजक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. आज ग्रामीण भागातील महिला स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहण्यासाठी तयार झाल्याने वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजीक आणि पर्यायाने गावच्या आर्थिक विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
या दोन दिवशी 100 हून अधिक महिला बचत गटांच्या स्टॉलमध्ये हातसडीचा तांदूळ, इंद्रायणी तांदूळ, चिक्की, विविध मसाले, शुगर फ्री बिस्किटे, सेंद्रिय हळद, लाकडी खेळणी, सेंद्रिय गुळ व काकवी, गांडूळ खत, स्ट्रॉबेरी, कुरडई, भातवडी, सांडगे आदीसह उन्हाळी पदार्थ, पापड, विविध लोणची, गारमेंट, शोभेच्या वस्तू, खाद्यपदार्थ (कडधान्य विविध प्रकारचे), इमिटेशन ज्वेलरी, विविध प्रकारच्या चटण्या, आवळा कॅन्डी, शाकाहारी जेवण, थालीपीठ, गुळपोळी बरोबरच बिर्याणीचे स्टॉल, गोधडी, पिलो कव्हर, क्रॉफ्ट बॅग्स, मातीची भांडी, ड्रेस, चप्पल, स्वीट कॉर्नर, ड्रेस, बेकरी प्रॉडक्ट आदी स्टॉल सहभाग होणार आहेत.
राज्यातील पहिलीच तालुका स्तरावरील जत्रा
उमेद अभियान अंतर्गत सुरू असलेल्या महिला स्वयंसहायता बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित मालाचे विक्री प्रदर्शन महाराष्ट्र शासनाच्या राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस यात्रा आणि पुणे विभागीय स्तरावर भीमथडी यात्रेच्या माध्यमातून होत असते. तसेच सातारा जिल्हा स्तरावर मानिनी यात्रा होत असते. राज्यात पहिल्यांदाच तालुकास्तरावर महिला बचत गटाच्या उत्पादित मालाचे विक्री प्रदर्शन कराडच्या जत्रेच्या निमित्ताने होत आहे. विशेषतः लोकसहभागातून होणारा हा नाविण्यपूर्ण उपक्रम महिला बचत गटांना पाठबळ देणारा आणि ग्राहकांना खात्रीशीर व दर्जेदार घरगुती मालाचे उत्पादन खरेदी करण्याची संधी मिळाली आहे.