कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहरात अत्यावश्यक सेवासह सर्व दुकाने सोमवारपासून सुरु झाली आहे. तसेच ग्रामीण भागातील नागरिकांचीही प्रवासी वाहतूक सुरु झाल्यामुळे कराड शहरात मोठ्या संख्येने प्रवासी वाहतूक हि रिक्षा चालकांकडून केली जाते. कराड तालुक्यातील रिक्षा चालकांच्या कोरोना चाचणीस सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. कराड पालिका, वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु केल्या कोरोना चाचणीच्या या मोहिमेत सोमवारी २०२ रिक्षा चालकांची चाचणी करण्यात आली.
सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशाने प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदीप वाकडे, पोलिस अधिकारी रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके,आरोग्य विभाग यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर कराड शहरातील प्रशासकीय कार्यालये, बसस्थानक, पोलिस स्टेशन, या ठिकाणी कार्यरत तसेच कामानिमित्त येणार्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर नगरपरीषद, प्रशासकीय इमारत, पंचायत समिती आदी ठिकाणी कोरोना चाचणी करण्यात आली.
वाहतूक शाखा व पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने राबविलेल्या रिक्षा चालकांच्या कोरोना चाचणीच्या मोहिमेत मोठ्या संख्येने रिक्षा चालकांनी सहभाग घेतला. यामध्ये पर्यंत 186 रिक्षा चालकांची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. यावेळी कराड वाहतूक शाखेत पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, वाहतूक शाखा प्रमुख सरोजिनी पाटील, सहाय्यक श्री जाधव, मुख्याधिकारी रमाकांत डाके, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, तलाठी संजय जंगम, रिक्षा संघटनेचे अशोकराव पाटील यांच्या उपस्थितीत रिक्षा चालकांच्या कोरोना चाचणीस प्रारंभ करण्यात आला.