सातारा | रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ माजी मंत्री सांगोल- मंगळवेढा मतदार संघाचे माजी आमदार (कै.) गणपतराव देशमुख यांना मरणोत्तर जाहीर झाला. तर ‘रयत माउली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार’ नगर जिल्ह्यात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या बीजमाता राहिबाई सोमा पोफेरे यांना संस्थेचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी जाहीर केला.
कर्मवीर भाऊराव पाटील यांची 134 वी जयंती न्यावर्षीही साधेपणाने साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त आयोजिलेल्या ऑनलाइन कार्यक्रमात खासदार पवार यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील होते. संस्थेच्या वतीने दिला जाणारा ‘पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार” माजी मंत्री (कै.) गणपतराव देशमुख यांना जाहीर करण्यात आला. 2 लाख 50 हजार रुपये, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रयत माउली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील राष्ट्रीय पुरस्कार नगर जिल्ह्यात उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या बीजमाता राहिबाई सोमा पोफेरे यांना जाहीर करण्यात आला. 2 लाख 50 हजार रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
ऑनलाइन कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. भगीरथ शिंदे, संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, जनरल बॉडी सदस्य, लाइफ मेंबर, लाइफ वर्कर, रयत सेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आज सकाळी कर्मवीर समाधीला खासदार उदयनराजे भोसले, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, अँड. दत्तात्रय बनकर, सहसचिव संजय नागपुरे, संस्थेचे ऑडिटर डॉ. शिवलिंग मेनकुदळे, मध्य विभागाचे विभागीय अधिकारी राजेंद्र साळुंखे, संस्थेचे कायदा सल्लागार अॅड. दिलावरसाहेब मुल्ला, संस्थेचे समन्वयक डी. एस. सूर्यवंशी आदींच्या उपस्थितीत कर्मवीर समाधीस अभिवादन करण्यात आले. संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड यांनी आभार मानले.