हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन :संपूर्ण देशासह राज्यात देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. अशा वाढत्या संख्येला ऑक्सिजनचा पुरवठा करणे आवश्यक आहे. केंद्राकडून प्रत्येक राज्याला ऑक्सिजनच्या टँकर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑक्सिजनच्या अभावी अनेकांनी आपले प्राण गमावल्याची घटना देखील आपण पाहिल्या आहेत. मात्र आता कर्नाटकातून कोल्हापूर, सांगली, सातारा याबरोबरच सहा जिल्ह्यांना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा रोखला गेल्याची माहिती समोर येत आहे.
केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारा 50 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा कर्नाटक सरकारने रोखला आहे. कर्नाटकच्या बेल्लारी मधून कोल्हापूर, सांगली सातारा, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा सुरू होता पण कर्नाटक सरकारने तो आज बंद केला. सांगली जिल्ह्यात कर्नाटकातून रिकामा टँकर परत आला आहे. सांगली जिल्ह्याला रोजची 43 टन ऑक्सिजनची सध्या गरज आहे. ऑक्सिजन अभावी रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. सध्या तरी यात राजकारण वाटत नाही मात्र केंद्राने लवकरात लवकर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी पाटील यांनी केली आहे.