हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार करुणा शर्मा याना कोल्हापूरच्या जनतेने सपशेल नाकारले असून त्यांना अवघी 134 मते मिळाली आहेत. करुणा शर्मा यांच्यापेक्षा नोटाला अधिक मतदान झालं आहे. करुणा शर्मा यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे.
करुणा शर्मा यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी जोरदार कंबर कसली होती. करुणा शर्मा यांनी प्रचाराचा धडाका या निवडणुकीत लावला होता त्यामुळे एकप्रकारे रंगत आली होती मात्र त्यांना मतदारांनी स्पष्टपणे नाकारलं असून त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. करुणा शर्मा यांच्यापेक्षा नोटाला अधिक मतदान झालं आहे.
निवडणूक निकालानंतर करुणा शर्मा यांनी निवडणुकीत आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा आरोप केला. तसेच, ही निवडणूक रद्द करण्यात यावी, यासाठी आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचंही करुणा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. ”ही मतमोजणी रद्द करुन निवडणूकच रद्द करण्यात यायला हवी होती. पण, तरीही मतमोजणी सुरु आहे, याचा मी विरोध करते. याविरोधात मी सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेणार आहे, ही लोकशाही आहे, कायदा सर्वांसाठी समान आहे”, असे करुणा शर्मांनी म्हटले आहे.
दरम्यान, कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसने भाजपचा दणदणीत पराभव केला. काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी तब्बल 18 हजाराहून अधिक मतांनी भाजपचा पराभव केला आहे. जयश्री जाधव यांना ९६ हजार २२६ मतं मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांना ७७ हजार ४२६ मतं मिळाली आहेत. या निवडणूकीत भाजप विरुद्ध काँग्रेस असा थेट सामना रंगला होता. राज्यातील अनेक दिग्गज नेतेमंडळीनी कोल्हापूर निवडणूकीत भाग घेऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते.