मानसिक आरोग्य दिनानिमित्त कर्वे समाज सेवा संस्थेच्यावतीने विविध उपक्रम, रस्त्यावर फिरणाऱ्या ११ मनोरुग्णांची “श्रद्धा” मध्ये रवानगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे | सुनिल शेवरे

यंदाचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ भरत वाटवानी यांच्या कर्जत येथील “श्रद्धा” पुनर्वसन केंद्राच्या सहकार्याने पुणे येथील कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशन विभागाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आज पुणे शहरामध्ये मानसिक आरोग्यासंबंधी जनजागृती रॅलीसह विविध उपक्रम उपक्रमांनी मानसिक आरोग्य दिवस साजरा केला.

पुणे येथील कर्वे समाज सेवा संस्था व कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या वतीने दरवर्षी जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यात येते. यावर्षी कर्वे संस्थेचे समुपदेशन विभागाचे विद्यार्थी व श्रद्धाच्या समाजकार्यकर्त्यानी पुणे शहरातील विविध भागांमधील रस्त्यांवर उतरून प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन मानसिक आरोग्यासंबंधी जनजागृतीपर माहिती पुस्तिकांचे वितरण करीत मानसिक आरोग्य व उपचारासंबंधी चर्चा केली. त्यानंतर ससून सर्वोपचार रुग्णालय ते अपंग कल्याण आयुक्तालय परिसरामध्ये जनजागृतीपर रॅली काढली तसेच शहरातील रस्त्यावर फिरणाऱ्या निराधार ११ (८ पुरुष व ३ महिला) मनोरुग्णांना उचलून त्यांच्या पुढील उपचार व पुनर्वसनासाठी श्रद्धा च्या कर्जत येथील पुनर्वसन केंद्रामध्ये रवानगी करण्यात आली.

श्रद्धा चे संस्थापक रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ भरत वाटवानी व कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रा. चेतन दिवाण, संचालक डॉ दीपक वलोकर, मानद संचालक डॉ महेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या मानसिक आरोग्य सप्ताहाच्या विविध उपक्रमाना नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे प्रा. चेतन दिवाण यांनी सांगितले.

यावर्षीच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे ब्रीद वाक्य हे “बदलत्या जगामधील तरुण आणि मानसिक आरोग्य” असे असून यासंबंधी कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये नुकतीच एकदिवसीय परिषद देखील घेण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित समाजातील तरुणांना एक प्रेरणादायी संदेश मिळावा यासाठी ७ वर्षाच्या प्रसन्ना या चिमुकलीने स्वतःच्या हातात पोस्टर घेऊन आजच्या जनजागृती रॅलीसह दिवसभर घेण्यात आलेल्या जनजागृतीपर उपक्रमांमध्ये सहभागी होऊन भर उन्हामध्ये जोरजोरात घोषणाबाजी करीत उपस्थितांची मने जिंकली.

श्रद्धा पुनर्वसन केंद्राच्या सचिन म्हसे, शैलेश शर्मा, सुरेखा राठी, गणेश रणदिवे तसेच कर्वे समाज सेवा संस्थेच्या समुपदेशिका वृषाली दिवाण, ग्रंथपाल प्रकाश पवार, संजीवनी मुंढे, शर्मिला सय्यद, पद्मजा शिंदे, अरुंधती कुलकर्णी, वैशाली मेत्रानी, मेधा पुजारी, कुणाल बानुबाकवडे आदींनी रस्त्यावरील मनोरुग्णांना उचलून “श्रद्धा” मध्ये पुढील उपचार व पुनर्वसनास पाठविण्यासाठी परिश्रम घेतले.

Leave a Comment