पुणे | पुण्याचे ग्रामदैवत समजला जाणारा मानाचा पहिला श्री कसबा गणपती यंदा १२६ वा गणेशोत्सव साजरा करत आहे. यंदाचा मानाचा ‘श्री कसबा गणपती पुरस्कार’ कलाक्षेत्रासाठी अभिनेता सुबोध भावे यांना जाहीर करण्यात आला आहे तर एम.आय.टी. चे राहुल कराड यांना शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. कसबा गणपती हा पुण्यातील अग्रगण्य गणपती असून तो मानाचा पहिला गणपती आहे. कसबा गणेश मंडळा तर्फे दरवर्षी कसबा गणपती पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या पुरस्कार्थींची नावे मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी पत्रकार परीषद घेऊन जाहीर केली. तसेच यंदा श्रींची प्रान प्रतिष्ठपना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सचिव भैयाजी जोशी यांच्या हस्ते दिनांक १३ सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती शेटे यांनी सांगितली.
कसबा गणपती पुरस्काराला ३८ वर्षांची परंपरा आहे. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांत विशेष कामगीरी करणार्या ५ खास व्यक्तींना कसबा गणपती पुरस्कार देण्यात येतो. त्यानुसार यावर्षीच्या पुरस्कारांची घोषणा मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांनी केली. यावर्षीचे मानाचे कसबा गणपती पुरस्कार अभिनेते सुबोध भावे, वैद्य योगेश बेंडाळे, एम.आय.टी. चे राहुल कराड, भारतीय बास्केटबाॅल संघाची कर्णधार शिरिन लिमये आणि प्रकाश दांडगे गुरुजी आदींना जाहीर झाले आहेत.