कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी ‘मविआ’ कडून ‘या’ नेत्याला तिकीट; नाना पटोलेंचं ट्विट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या दिवंगत आमदार मुक्त टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केला आहे. महाविकास आघाडीत कसब्याची जागा काँग्रेस लढवणार हे आधीच निश्चित झालं होत. आता काँग्रेसने रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

पुणे जिल्ह्यातील कसबा मतदार संघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत. कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून श्री. रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे अशी माहिती नाना पटोले यांनी ट्विट करत दिली आहे.

दरम्यान, कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून हेमंत रासने याना उमेदवारी देण्यात आली आहे.त्यामुळे आता रवींद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने असा थेट सामना पाहायला मिळणार आहे. आज दोन्ही उमेदवार अर्ज भरणार असून यानिमित्ताने काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात येईल. महाविकास आघाडी एकत्रितपणे ही निवडणूक लढणार असल्याने भाजप आपला गड राखणार कि महाविकास आघाडी भाजपच्या बालेकिल्ल्यात एंट्री करणार याकडे सर्वांचे लक्ष्य असेल.