हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या शाळा-महाविद्यालयांना सुट्टी असल्यामुळे विद्यार्थ्यासह त्यांचे पालक पर्यटनस्थळी फिरण्यासाठी जात आहे. अशावेळी रस्त्याकडेला अनधिकृत पार्किंगच्या ठिकाणी वाहने उभी करत आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. अशा वाहनांवर सध्या पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. कात्रज परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पोलिस ‘अॅक्शन मोड’मध्ये असून कात्रज येथे सातारा रस्त्यावर अनधिकृत पार्किंगच्या याठिकाणी उभ्या २५ वाहनांवर पोलिसांनी नुकतीच दंडात्मक कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कात्रज चौक ते गुजरवाडी फाटादरम्यानच्या रस्त्यावर वाहतुकीची मोठी वर्दळ असते. या परिसरात पीएमपीची दोन बसस्थानके असल्यामुळे बसेसची जास्त ये- जा होत असते. अशात रस्त्याच्या दुतर्फा ट्रक, बससह अवजड वाहनांचे अनधिकृत पार्किंग केले जात आहे. त्यातच हातगाडी व व्यावसायिकांनी या रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे या रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे.
हा प्रकार पाहिल्यानंतर येथील वाहतूक कोंडीची समस्या मार्गी लावण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत कणसे यांच्या सूचनेनुसार पोलिस नाईक संदीप कुडले, महेश पवार यांनी 25 वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. या कारवाईमुळे येथील वाहतूक कोंडी कमी झाली.