हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक दौऱ्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना थेट इशारा दिला. तसेच आनंद दिघे यांच्याबाबत राजकारण झाले असून त्याबाबतही लवकरच खुलासा करणार असल्याचे सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी एक ट्विट केले असून त्यामधून त्यांनी शिंदेंवर निशाणा साधला आहे. “आनंद दिघे यांच्याबाबत एवढं काही घडलं हे तुम्हाला माहीत होतं, तर तुम्ही 25 वर्षे गप्प का बसला होता? असा थेट सवाल केदार दिघे यांनी शिंदे यांना विचारला आहे.
केदार दिघे यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे की, मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार आहे…. मग मी म्हणतो, इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे. सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?, सवाल त्यांनी शिंदे यांना केला आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणतात आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार….मग मी म्हणतो इतके दिवस गप्प का बसलात? माहित असूनही तुम्ही 25 वर्षे गप्प बसला असाल तर ठाणेकरांशी आणि दिघेसाहेबांशी सर्वात मोठी प्रतारणा तुम्ही केली आहे.सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाल?
— Kedar Dighe (@MiKedarDighe) July 30, 2022
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
नाशिक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विश्वासघात कुणी केला, याचा विचार करण्याची गरज आहे. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ केले. बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी कधी तडजोड केली नाही, त्यांच्या विचारांशी कुणी प्रतारणा केली. त्यांच्या आणि माझ्यातील ज्या गोष्टी आहेत, त्या मी आज सांगणार नाही. मात्र एक दिवस मलाही तोंड उघडावे लागेल, मलाही भूकंप करावा लागेल. आनंद दिघेंबाबत झालेल्या राजकारणाचाही लवकरच खुलासा करणार असल्याचा इशारा शिंदे यांनी ठाकरेंना दिला.