केजरीवालांची गुजराती भाषेत मतदारांना साद; दिली ‘ही’ मोठी आश्वासने

Arvind kejriwal
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । केंद्रीय निवडणूक आयोगाने आज गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. एकूण 2 टप्प्यात ही निवडणूक होणार असून 1 आणि 5 डिसेंबरला मतदान आहे आणि 8 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. आयोगने निवडणूक कार्यक्रम जाहीर करताच आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुजराती भाषेतील आपला एक विडिओ शेअर करत मतदारांना साद घातली आहे.

केजरीवाल यांनी 1 मिनिटाचा विडिओ शेअर केला आहे. यामध्ये ते चक्क गुजराती भाषेत बोलताना दिसत आहेत. मला आपल्या कुटुंबाचा एक भाग समजा. माझ्यावर इतके प्रेम केल्याबद्दल धन्यवाद. मी तुम्हाला वचन देतो की तुमचा भाऊ बनून तुमच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी मी सांभाळेन. मी तुम्हाला महागाईपासून मुक्त करीन, मी वीज मोफत करीन, तुमच्या मुलांसाठी मी एक सुंदर शाळा बांधीन, तुमच्या कुटुंबाच्या उपचारासाठी मी एक अप्रतिम रुग्णालय बांधीन, तुमच्या मुलांना रोजगाराची व्यवस्था करीन, श्री रामजींच्या दर्शनासाठी मी तुम्हाला अयोध्येला नेईन. आम आदमी पार्टीला फक्त एक संधी द्या असं आवाहन केजरीवालांनी केलं.

दरम्यान, गुजरातमध्ये यंदा तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. आम आदमी पक्ष प्रथमच गुजरातमध्ये निवडणूक लढवणार असून यामुळे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना फटका बसण्याची शक्यता आहे. गुजरात हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे होम ग्राउंड आहे . त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. यापूर्वी 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे कि टक्कर पाहायला मिळाली होती. तेव्हा काँग्रेसने 77 जागा जिंकल्या होत्या भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या.