औरंगाबाद | शहरातील सिडकोचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यात यावेत यासह विविध मागण्यांसंदर्भात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. शिवसेनेसह नागरिकांच्या शिष्टमंडळाने शिंदे यांची मुंबई येथे भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, सिडको एन-४ सेक्टरमधील विहिरीची जागा सिडको विभागाकडून पोलीस स्टेशनसाठी देण्यात आली आहे. पण नागरिकांचा त्याला विरोध आहे. या विहिरीत गणेश विसर्जन केले जात होते.
विहिरीच्या काठावर दत्त मंदिराची व हनुमान मंदिराची स्थापना करण्यात आली त्यामुळे जागा वाटपाचा निर्णय रद्द करावा, यासह इतर मागण्या करण्यात आल्या. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांची भेट घेत सिडकोच्या जागा नाममात्र दराने मंदिर ट्रस्टना द्याव्यात, मालमत्ता पूर्णपणे फ्री होल्ड करण्यात याव्यात, हा निर्णय होईपर्यंत मालमत्ता हस्तांतरणासाठी लावण्यात येणारे शुल्क कमी करावे.
हस्तांतरण शुल्क ५० टक्के कमी करून मालमत्ता फ्री होल्ड होईपर्यंत त्यात वाढ करू नये. मालमत्तेवरील बंधने शिथिल करावेत, यासासह विविध मागण्या करण्यात आल्या. ॲड. आशुतोष डंख, शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, उपशहरप्रमुख शिवा लुंगारे, बजरंग विधाते, साहेबराव घोडके उपस्थित होते.