खंबाटकी बोगदा : वाईच्या तहसिलदारांचा ठेकेदाराला 33 कोटीचा दणका, गौण खनिज उत्खनन कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा जिल्ह्याच्या हद्दीतील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खंबाटकी बोगदा विस्तारीकरणाच्या उत्खननासाठी गायत्री क्रसेन्ट प्रोजेक्ट या ठेकेदार कंपनीस 5 लाख 15 हजार 915 ब्रास गौण खनिज उत्खननापोटी स्वामित्व धन व दंडात्मक रक्कम मिळून एकूण 32 कोटी 89 लाख 88 हजार रुपये दंड भरण्याचे आदेश तहसीलदार रणजित भोसले यांनी दिले.

महामार्गावरील पुणे-सातारा रस्त्यावर विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत साताऱ्यात खंबाटकी घाटात बोगद्याचे काम सुरू आहे. यासाठी गायत्री क्रसेन्ट प्रोजेक्ट या कंपनीस ठेकेदार म्हणून नेमण्यात आले आहे. या कंपनीने आतापर्यंत या ठिकाणी केलेल्या गौण खनिजप्रकरणी स्वामित्व धन व दंडात्मक रक्कम भरण्याची नोटीस संबंधित ठेकेदारास तहसीलदार रणजीत भोसले व सातारा जिल्हा प्रशासनाने वेळोवेळी बजावली होती. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनीही या कंपनीने केलेल्या उत्खननासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश दिले होते. वाई तहसीलदारांनी दिलेल्या नोटिशी विरोधात संबंधित कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन नोटीस रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. हे सरकारी काम असून ज्या गटातून हे उत्खनन केले जात आहे त्याच गटात हे वापरले जाणार आहे. शासनाचे गौण खनिज स्वामित्वधन व दंडाची रक्कम आम्हाला लागू होत नाही.

न्यायालयाने या नोटिसा रद्द कराव्यात व स्वामित्व धन दंडाची रक्कम माफ करावी, अशी मागणी ठेकेदाराने न्यायालयाकडे केली होती. सुनावणीदरम्यान हे आदेश नसून नोटीस आहेत व यासाठी तहसीलदार वाई यांच्याशी संपर्क साधून संबंधित कंपनीने आपले म्हणणे त्यांच्याकडे सादर करावे. तसेच तहसीलदारांनी त्यांचे म्हणणे एकूण घेऊन योग्य ते आदेश पारित करावेत, असे निर्देश उच्च न्यायालयाने तहसीलदार रणजित भोसले यांना दिले होते. याप्रमाणे वाई तहसीलदार यांच्यासमोर सुनावणी झाली. संबंधित कंपनीचे म्हणणे ऐकून घेतल्यावर शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे सदर गौणखनिज उत्खनाचे स्वामित्व धन व दंडापोटी संबंधित कंपनीला 32 कोटी 89 लाख 88 हजार रुपये भरण्याचे आदेश तहसीलदार भोसले यांनी दिले आहेत. 

Leave a Comment