कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
भारताला ऑलिंपिकमध्ये पहिले वैयक्तिक पदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्याचे गोळेश्वर गावचे सुपुत्र पै. खाशाबा दादासाहेब जाधव यांची जयंती आहे. पै. खाशाबा जाधव यांची 97 वी जयंती आहे. या जयंतीनिमित्ताने महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्र ऑलिंपिक असोशिएशन यांनी पै. खाशाबा जाधव यांचा जन्मदिन हा महाराष्ट्राचा क्रिडा दिन म्हणून जाहीर केला आहे. गेल्या अनेक वर्षापासून आमची मागणी होती, अखेर 15 जानेवारी हा क्रिडा दिवस जाहीर केल्याबद्दल आभार पै. खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांनी मानले आहेत.
कराड तालुक्यातील गोळेश्वर येथे पै. खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 साली झाला. खाशाबा जाधवांना लहानपणापासूनच पैलवानकीची प्रचंड आवड होती. गोळेश्वर जाधव कुटुंबातील भावंडे पैलवान होती तर त्यांचे वडील दादासाहेब जाधव हे स्वत: एक नामांकित पैलवान असल्याने घरात कुस्तीसाठी चांगले वातावरण होते. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ते कुस्ती शिकले. त्यांचे शालेय शिक्षण टिळक हायस्कूल, कराड येथे झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण राजाराम कॉलेज,कोल्हापूर येथे झाले.
पै. खाशाबा जाधव हे 1948 साली ऑलिम्पिक स्पर्धेत सहाव्या क्रमांकावर पोहचणारे पहिले भारतीय होते. तर पुढे 1952 साली त्यांनी हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीत 52 किलो वजनगटात कांस्यपदक पटकावणारे पहिले भारतीय होते. भारताचे हे ऑलिंपिकमधील पहिले वैयक्तिक पदक होते. आज त्यांना कराड येथील कार्वे नाका येथे 97 व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.