जावली | नैसर्गिक आपत्तीच्या काळात जात व धर्म न मानता माणुसकीच्या नात्यातून नांदगणे गावचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी खिदमत -ए-खल्क समिती व मुस्लिम समाजाने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, असे प्रतिपादन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुध्दे यांनी केले.
जावळी तालुक्यातील नांदगणे येथे अतिवृष्टीमुळे पिण्यांच्या पाण्याची योजना मुजून गेल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत होती. ग्रामस्थांच्या मागणीनुसार सातारा येथील खिदमत-ए-खल्क समिती व मेढा मुस्लीम समाजाच्या वतीने 600 मीटर पाईप व पाणी साठवण टाकी देण्यात आली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी पंचायत समितीचे विस्ताराधिकारी ए.पी. पवेकर, हाजी मोहसिन बागवान, साजिद शेख, सादिक शेख, हापिज मुराद, अज्जू घड्याळवाले,आरीफ खान, तन्वीर शेख, इम्रान आतार, साजिद मुजावर, सत्तार पठाण, सादिक सय्यद, उपसरपंच जगन्नाथ दळवी, पोलीस पाटील विष्णू दळवी, ग्रामपंचायत सदस्य अविनाश दळवी, श्रीरंग लोहार, महंमद पठाण, दत्ता लोहार, सतीश पार्टे, शांताराम दळवी, राजाराम दळवी आदींची उपस्थिती होती.
यावेळी साजिद शेख म्हणाले, जिल्ह्यात आपत्तीच्या काळात जात व धर्म न पाहता खिदमत संस्थेने पूरग्रस्तांना सामाजिक बांधिलकीतून मदत केली आहे. माणुसकी जपा ही अल्लाची शिकवण असून संस्था अडचणीत असलेल्या गावांना प्राधान्याने मदत करणार आहे. या कामासाठी युवकांनी केलेले श्रमदान कौतुकास्पद आहे. यावेळी संस्थेच्या वतीने पाईप व पाणी साठवण टाकी देण्यात आली. संजय दळवी यांनी सूत्रसंचालन केले. बापू उंबरकर यांनी आभार मानले. यावेळी खिदमत चे सभासद, केळघर, नांदगणे येथील ग्रामस्थ व युवक उपस्थित होते.




