शिरवळ | पूर्वीचे प्रेमसंबंध तोडल्याने 25 वर्षीय युवतीचे कारमधून अपहरण करणाऱ्यांचा डाव युवतीने आरडाओरडा केल्याने महामार्गावरून जाणाऱ्या एका जोडप्याने दुचाकी आडवी मारून उधळला. त्याचवेळी शिरवळ येथील नागरिक व पोलिसांनी युवतीची सुटका केली. या प्रकरणी जालना जिल्ह्यातील तुषार भारतसिंग परदेशी (वय-28) व आशिष परमेश्वर काळबांडे (वय-22) यांना शिरवळ पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जालना जिल्ह्यातील एका युवतीचे आठ वर्षांपूर्वी त्याच जिल्ह्यातील तुषार परदेशी या युवकाशी प्रेमसंबंध जुळले होते; परंतु त्याने लग्न करण्यास नकार दिल्याने युवतीने हे प्रेमसंबंध तोडून टाकले होते. त्यानंतरही तुषारने पुन्हा लग्नाची मागणी घातली असता, युवतीने नकार दिला होता. अखेर तुषारने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. त्यानंतरही तुषार हा संबंधित युवतीला यावर्षी जानेवारीपासून सतत फोन करून त्रास देत होता. दरम्यान, ही युवती शुक्रवारी नेहमीप्रमाणे कंपनीत जाण्यासाठी शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पतसंस्थेसमोर आली असता, तुषार परदेशी व आशिप काळबांडे कार (एमएच-४३ एवी-२३४९) मधून तेथे आले. तुषार कारमधून उतरल्यावर ही युवती महामार्गाच्या दिशेने पळत सुटली. तुषारने पाठलाग करून तिला कारमध्ये जबरदस्तीने बसविण्याचा प्रयत्न केला. युवतीने प्रतिकार केला असता, तुषारने मारहाण करत तिला कारच्या मागील सीटवर बसवले. त्यानंतर आशिषने कार सातारा बाजूकडे पळविली.
सदरच्या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजू अहिरराव, हवालदार किशोर नलावडे, प्रशांत वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, युवतीचा आरडाओरडा ऐकून सातारा बाजूकडून पुणे बाजूकडे निघालेल्या दुचाकीवरील एका जोडप्याने कारचा पाठलाग केला. त्यांनी दुचाकी आडवी मारल्याने आशिषला कार थांबवावी लागली. त्यावेळी पोलीस व नागरिकांनी प्रेमवीर तुषार आणि चालक आशिष याला पकडून युवतीची सुटका केली. या प्रकरणी विनयभंग व अपहरणाची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई तपास करत आहेत.