औरंगाबाद | तुझ्या पत्नीसोबत माझे प्रेम संबंध आहे. तिला मी घेऊन जाण्यासाठी आलोय असे म्हणत थेट मुलाचेच अपहरण केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार ९ जून रोजी बजाजनगरात घडला. आरोपीला श्रीगोंदा येथे अटक करून मुलाची सुटका करण्यात आली. सागर गोरख आळेकर (रा. श्रीगोंदा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. विशेष म्हणजे, आळेकर हा त्या विवाहितेच्या भावाचा मित्र आहे.
वाळूज बजाजनगर येथील सावरकर कॉलनीत एक ३६ वर्षीय कामगार त्याच्या ३३ वर्षीय पत्नी व सहा वर्षाच्या मुलासह किरायाच्या खोलीत वास्तव्याला आहे. ९ जून रोजी कामगाराची पत्नी व मुलगा घरी असताना त्यांच्या मेव्हण्याचा मित्र सागर आळेकर सकाळी नऊच्या सुमारास कार (एमएच-४२-एएच-९६५५) घेऊन कामगाराच्या घरी आला. आळेकर हा मेव्हण्याचा मित्र असल्याने त्याला कामगार दाम्पत्याने चहापाणी करून जेवणही दिले. जेवण झाल्यानंतर आळेकर निघून गेला. मात्र, त्यानंतर त्याने ‘त्या’ कामगाराच्या पत्नीच्या मोबाइलवर संपर्क साधून मोहटादेवी मंदीराजवळ बोलावून घेतले. त्यामुळे कामगार दाम्पत्य तेथे गेले. त्यावेळी आळेकर कामगाराला म्हणाला कि ‘माझे तुझ्या पत्नीसोबत प्रेमसंबंध आहेत. मला तिला घेऊन जायचे आहे. तुला काय करायचे ते कर.’ त्यावेळी कामगाराची पत्नी त्याच्यासोबत गेली नाही. पुढे कामगार दाम्पत्य घरी परतले. तेव्हा आळेकर हा त्यांच्या मागे-मागे घरी आला. तिथे त्याने कामगाराच्या पत्नीला म्हणाला कि ‘तु येणार नसशील तर तुझ्या मुलाला घेऊन जातो’ असे म्हणून त्याने कामगाराच्या सहा वर्षाच्या मुलाचे कारमधून अपहरण केले.
या प्रकारामुळे भयभीत झालेल्या कामगार दाम्पत्याने पाठलाग करुन दुचाकीने थेट श्रीगोंदा गाठले. तेथील पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ धाव घेत आळेकरला ताब्यात घेतले. मुलाची सुटका करून कामगार दाम्पत्याच्या स्वाधीन केले. श्रीगोंदा पोलिसांनी आळेकरला एमआयडीसी वाळूज पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.