अजितदादा शहांपुढे लाचार, उदयनराजेंनी हुकूमशहांचे ‘पपेट’ होऊ नये; अभिनेत्याची जळजळीत टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि ठाकरे गटात नुकताच पक्षप्रवेश केलेले किरण माने (Kiran Mane) हे नेहमीची सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करत असतात. किरण माने कधी कधी राजकीय विषयांवर सुद्धा अगदी बेधडकपणे भाष्य करत असतात. आताही त्यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे, यामध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपची साथ दिल्याने त्यांनी अजित पवारांवर लाचार अशा शब्दात निशाणा साधलाय, तर दुसरीकडे उदयनराजे ३ दिवस दिल्लीला जाऊनही अमित शहांनी त्यांची भेट न घेतल्याने किरण माने यांनी उदयनराजेंनाही (Udayanraje Bhosle) सल्ला दिला आहे. महाराजांनी इतरांसारखे या हुकूमशहांचे ‘पपेट’ होऊ नये. वेळीच योग्य तो निर्णय घ्यावा असं किरण माने यांनी म्हंटल आहे.

किरण माने यांची पोस्ट जशीच्या तशी –

माझं आजोळ बारामती. मी गेली दहाबारा वर्ष अजितदादांना जवळनं बघितलंय, सातार्‍याच्या सर्किट हाऊसमध्ये कलेक्टर-कमिशनरपास्नं पत्रकारांपर्यन्त सगळ्यांवर बिनधास्त डाफरताना बघितलंय. कुणाची पर्वा न करता रूबाबात फिरताना बघितलंय. गुरगुरताना बघितलंय. अशा रांगड्या माणसाला अमित शहापुढं लाचार, हतबल बनून उभं राहिलेलं पाहून सुरूवातीला लै वाईट वाटलं….हळूहळू कळलं की दादांचा तो रूबाब होता कारण पाठीशी साहेब होते. आता स्वबळावर झगडायचंय. अभिषेक बच्चनला वडिलांचा वरदहस्त काढून घेऊन एकदम यवतमाळला पाठवून एकांकिकांपास्नं स्ट्रगल करायला लावला तर कसं होईल? त्याला मनोज तिवारीसुद्धा हाडतुड करेल… तसं दादांचं झालंय हे कळलं. दादांविषयी आदर कमी नाही झाला पण त्यापेक्षा कीव जास्त वाटायला लागली.

जसं बारामती आजोळ, तशी माझी मायभूमी सातारा. पक्ष-फिक्ष बाजूला ठेवून आमचं सातारच्या गादीवर प्रेम. आज असं ऐकलं की आम्हा सातारकरांचे आदरस्थान श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तीन दिवस दिल्लीत आहेत…कारण त्यांना अमित शहाची अपाॅईंटमेन्ट मिळत नाही ! आजची भेटही रद्द झाली. उद्याची वेळ मिळालीय. हा फक्त महाराजांचा अपमान नाही, हा स्वराज्याच्या राजधानीचा अपमान आहे. एवढीच इच्छा आहे की महाराजांनी इतरांसारखे या हुकूमशहांचे ‘पपेट’ होऊ नये. वेळीच योग्य तो निर्णय घ्यावा.

मराठी माणसाचा अभिमान असणार्‍या नेत्यांना स्वाभिमान गहाण ठेवून परप्रांतीयांच्या वळचणीला जायची वेळ येणं हे मराठी मुलखासाठी घातक आहे. हे असेच चालू राहिले तर आपल्याला लवकरच ‘जय गुजरात’ अशी घोषणा देण्याची सक्ती आल्याशिवाय रहाणार नाही. ही अतिशयोक्ती नाही. आत्ताच मुंबईत हायकोर्टापासून अनेक ठिकाणी गुजराती बोर्ड दिमाखात झळकू लागलेले आहेत.
वेळीच जागे व्हा.

जय महाराष्ट्र !

किरण माने.