सातारा | सातारा जिल्ह्यातील 5 तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 69.31 टक्के मतदान झाले. आता सत्तारूढ मदन भोसले की आ. मकरंद पाटील यांच्यावर विश्वास दाखवतात याचा फैसला उद्या गुरुवारी दि.5 मे रोजी दुपारपर्यंत होणार आहे.
किसन वीर साखर कारखान्यांत 52 हजार सभासद व वाईसह खंडाळा, जावळी, सातारा व कोरेगाव तालुक्यांचे कार्यक्षेत्र आहे. प्रचार करताना दोन्हीकडून जोरदार आरोप- प्रत्यारोप करण्यात आले. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष, माजी आमदार मदन भोसले यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनल व आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसनवीर कारखाना बचाव पॅनल यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. मदन भोसले यांना कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांची तसेच आमदार मकरंद पाटील यांना आमदार शशिकांत शिंदे यांची भक्कम साथ लाभली. त्यामुळे या निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच रंग भरला होता.
संचालक मंडळाच्या एकूण 21 जागांसाठी चुरस पाहायला मिळाली. अंतिम आकडेवारी हाती आली, तेव्हा 69.31 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 51 हजार 716 पैकी 35 हजार 771 मतदारांनी मतदान केले. सोसायटी गटातून 374 पैकी 331 मतदारांनी मतदान केले. मतदानाचा वाढता टक्का कोणाला फायदेशीर ठरणार, यावर आता चर्चा झडू लागल्या आहेत. किसनवीर कारखान्यात पुन्हा सत्ताधारी की परिवर्तन यांचा फैसला उद्या दुपारी लागणार आहे.