किसनवीर साखर कारखान्याचा 52 वा गळीत हंगाम शुभारंभ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
खासदारकी, आमदारकी लढविताना पराजयही होतो आणि जिंकताही येतं; परंतु डबघाईने बंद पडण्याच्या अवस्थेत असणाऱ्या किसन वीर कारखान्याची निवडणूक जिंकून कारखान्याला पुन्हा ऊर्जितावस्थेत आणणे हे एक आव्हान होते. ते आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांनी स्वीकारले, याचे फलित आज ‘किसन वीर’ सुरू करून दाखविला यात दिसून येत आहे. किसन वीर कारखाना आदर्शवत करण्यासाठी साथ द्यावी, असे आवाहन विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक- निंबाळकर यांनी केले.

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या 52 व्या गळीत हंगाम प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष व्ही. जी. पवार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, किसन वीरचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, खंडाळ्याचे उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, सूतगिरणी अध्यक्ष शशिकांत पिसाळ, संचालक बाबासाहेब कदम, बकाजीराव पाटील, वसंतराव मानकुमरे, उदय कबुले, महादेव मसकर, शशिकांत पवार, बाळासाहेब सोळस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. कारखान्याचे संचालक संदीप चव्हाण व सौ. सुषमा संदीप चव्हाण या उभयतांच्या हस्ते गव्हाणीचे पूजन करण्यात आले. या उभयतांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

आमदार रामराजे नाईक- निंबाळकर पुढे म्हणाले की, किसन वीर कारखान्याची निवडणूक लढवायची की नाही, याबाबत आमची चर्चा व्हायची; परंतु एवढ्या मोठ्या कर्जाचा डोंगर पाहून याबाबत चिंता वाटायची; परंतु मागील तीन-चार वर्षांत शेतकऱ्यांना होणारा त्रास, थकीत एफआरपी, कामगारांना होणारा मानसिक त्रास, बाहेरच्या कारखान्यांकडून शेतकऱ्यांना होणारी अवास्तव पैशांची मागणी यासाठी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. सभासदांनीही निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांना भरभरून साथ दिली.