हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांच्यावर किशोर आवारे यांच्या आईने थेट आरोप केले होते, परंतु पोलीस चौकशीत या हत्यामागील खरा सूत्रधार आता समोर आला आहे. किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणात माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच आरोपीने कबुली सुद्धा दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वी जुन्या नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली होती. त्यावेळी किशोर आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानाखाली मारली होती. वडिलांना मारल्याचा राग मनात धरून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने बदला घेण्याचं ठरवलं. त्यानुसार नगरपरिषद कार्यालयातच किशोर आवारे यांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी गौरव खळदेच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबुली दिली आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांकडून देण्यात आली आहे.
आधी गोळीबार अन मग तलवारीने किशोर आवारे यांची हत्या –
दरम्यान, १२ मे ला भर दुपारी ४ जणांनी किशोर आवारे यांची निर्घृण हत्या केली. किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन खाली आले असताना त्यावेळी त्या परिसरात दबा धरून बसलेल्या चार जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. आधी त्यांच्यांवर गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर कोयत्याने वार केले . आवारे हे रक्तबंबाळ अवस्थेत पडल्यानंतरही हल्लेखोर काहीवेळ तिथेच थांबून होते. जखमी अवस्थेतील आवारे यांना उपचारासाठी सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आवारे यांच्या हत्येनंतर संपूर्ण पुणे हादरले.