औरंगाबाद प्रतिनिधी । नुकताच संक्रांत हा सण साजरा झाला. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडवले गेले. मात्र नायलॉन व मांजा वापरण्यास बंधी असतांना पतंगबाजी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणाऱ्या नायलॉन व मांजा दोऱ्यामुळे शहरातील विविध भागांतील नागरीक जखमी झाले आहेत. जिवघेण्या नायलॉन मांजा विक्रीवर बंदी असतानाही त्याची शहरात बड्या व्यापाऱ्यांनकडून विक्री होत आहे. मात्र पोलिस छोट्या व्यापाऱ्यांना लक्ष करून थातूरमातूर कारवाई करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
बाजारात चायनीज मांजाची लपूनछपून मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवण्यासाठी बऱ्याच ठिकाणी बंदी घातलेल्या नायलॉन मांजाचा वापर होताना दिसून आले. शहरातील बसुंदरवाडी येथील २७ वर्षीय निशा निलेश काळे या महिलेचा मांजाने गळा चिरला गेला, तर लालचंद भुईशिणगे या लष्करी जवानाला यामुळे मोठी दुखापत झाली असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच सातारा परिसरातील रमाकांत मेहणकर यांच्या हाताला व खांद्याला जखम झाली आहे. असे अनेक जण किरकोळ व गंभीरपणे जखमी झाले आहेत.