हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयपीएल 2023 रंगतदार अवस्थेत आली असतानाच लखनौ सुपरजायंटला मोठा झटका बसला आहे. कर्णधार केएल राहुल आयपीएल बाहेर पडला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना राहुलला मोठी दुखापत झाली होती. त्यामुळे आयपीएलच्या उर्वरित सामन्यासाठी तो मुकणार आहे. खुद्द कर्णधारच संघाबाहेर गेल्यानंतर लखनौच्या अडचणी वाढल्या आहेत.
1 मे रोजी आरसीबीविरुद्धच्या सामन्यात फिल्डिंग करत असताना राहुलच्या उजव्या मांडीला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं होते. तसेच फलंदाजीसाठीही तो शेवटी आला होता. आज CSK विरुद्धच्या सामन्यानंतर राहुल गुरुवारी कॅम्प सोडणार असून स्कॅनसाठी मुंबईला जाणार आहे. 7 जूनपासून लंडनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्येही राहुल खेळू शकेल की नाही याबाबत शंका निर्माण झाली आहे.
केएल राहुलने यंदाच्या आयपीएलमध्ये आत्तापर्यंत 9 सामन्यात 274 धावा केल्या, यामध्ये दोन अर्धशतकांचा समावेश आहे. लखनौ सुपरजायंटने आत्तापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यात 5 सामन्यात विजय मिळवला आहे तर 4 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पॉईंट टेबल वर लखनौचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे.