नवी दिल्ली । भारतीय रेल्वेने आज देशभरातील 1155 गाड्या रद्द केल्या आहेत. रद्द झालेल्या बहुतांश गाड्या बिहार, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, पश्चिम बंगाल आणि आसामच्या मार्गांवर धावणार होत्या. याशिवाय रेल्वेच्या 14 गाड्याही अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.
कोरोनाच्या काळात आधीच रेल्वे कमी गाड्या चालवत आहे. आता धुक्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्या रद्द झाल्याने प्रवाशांच्या अडचणी वाढल्या आहेत. बुधवारीही संपूर्ण उत्तर भारत थंडीत दाट धुक्याने व्यापला गेला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
घरातून बाहेर पडण्यापूर्वी ‘या’ गोष्टी करा
जर तुम्हालाही ट्रेनने प्रवास करायचा असेल तर घरून निघण्यापूर्वी तुमच्या ट्रेनचे स्टेट्स जाणून घ्या. ज्या ट्रेनने तुम्हाला प्रवास करायचा आहे ती रेल्वे रद्द केतर झालेली नाही ना हे एकदा तपास. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रेल्वे गाड्या रद्द होत आहेत. एक दिवस आधीच मंगळवारी देखील तब्ब्ल 458 गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या होत्या. तर सोमवारीही हजारहून जास्त गाड्या रद्द करण्यात आल्या.
ट्रेनचे स्टेट्स कसे तपासायचे ?
रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी, रेल्वे रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट रेल्वेच्या वेबसाइटवर टाकते. याशिवाय त्याची माहिती NTES App वरही उपलब्ध आहे. कोणत्याही ट्रेनचे स्टेट्स जाणून घेण्यासाठी रेल्वेच्या https://enquiry.indianrail.gov.in/mntes या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. येथे ट्रेनचा नंबर टाकून तुम्ही ट्रेनचे स्टेट्स जाणून घेऊ शकाल.
ट्रेन रद्द झाल्यावर मिळतो ऑटोमेटिक रिफंड
जर तुमच्याकडे ई-तिकीट असेल आणि तुम्ही ज्या ट्रेनमध्ये प्रवास करणार आहात ती काही कारणास्तव रद्द झाली असेल तर तुम्हाला ई-तिकीट रद्द करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. ट्रेन रद्द झाल्यास ई-तिकीटचे पैसे ऑटोमेटिक रिफंड केले जातात. अशा परिस्थितीत तिकीट जमा पावती म्हणजेच TDR भरण्याची गरज नाही.
ट्रेन लेट झाली तर मिळू शकतात पूर्ण पैसे
जर ट्रेनला 3 तासांपेक्षा जास्त उशीर झाला असेल आणि प्रवासी प्रवास करत नसेल तर ट्रेन सुटण्यापूर्वी TDR भरावा लागेल. TDR फाइल करण्यासाठी, एखाद्याला IRCTC वेबसाइट किंवा मोबाइल ऍपवर लॉग इन करावे लागेल. त्यानंतर My Account वर जा आणि My Transaction हा पर्याय निवडा. आता फाइल TDR वर क्लिक करा.
काउंटर तिकीट कसे रद्द करावे ?
ऑनलाइन काउंटरवर तिकीट रद्द करण्यासाठी https://www.operations.irctc.co.in/ctcan/SystemTktCanLogin.jsf या लिंकला भेट द्या. तुमचा PNR नंबर, ट्रेन नंबर आणि कॅप्चा ऑप्शन भरल्यानंतर, रद्द करण्याच्या नियमांसह बॉक्सवर टिक करा. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा. आता बुकिंगच्या वेळी तुम्ही फॉर्मवर दिलेल्या नंबरवर OTP येईल. OTP टाकल्यानंतर सबमिटवर क्लिक करा. OTP टाकल्यानंतर, तुमच्या PNR डिटेल्स पेजवर दिसेल. PNR डिटेल्स व्हेरिफाय झाल्यानंतर, तिकीट रद्द करण्याच्या पर्यायावर क्लिक करा. यानंतर रिफंड रक्कम पेजवर दिसेल. यासोबतच बुकिंग फॉर्मवर लिहिलेल्या नंबरवर एक कन्फर्मेशन मेसेज येईल, ज्यामध्ये PNR आणि रिफंडची माहिती असेल.