कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
जो सफर की शुरुआत करते हैं, वो मंज़िल को पार करते हैं, एक बार चलने का होंसला तो रखो, मुसाफिरों का तो रस्ते भी इंतज़ार करते हैं… ही वाक्य कोल्हापूरच्या ७४ वर्षाच्या रवींद्र देशिंगे यांना तंतोतंत लागू पडतात. त्याच कारण असं कि, प्रत्येकाच्या आयुष्यात दहावी आणि बारावीच्या परिक्षांना मोठे महत्व आहे. त्यातच बारावीच्या परिक्षेला आज पासून प्रारंभ झाला आहे. कोल्हापुरातील इतर परीक्षा केंद्रांप्रमाणेच गोखले कॉलेज येथील परिक्षा केंद्रावरही अनेक पालक आपल्या पाल्यांना घेऊन आले होते. याच परिक्षा केंद्रावर लक्ष्मीपुरी येथील रहिवाशी रविंद्र बापू देशिंगे हे ७४ वर्षीय उद्योगपती सुद्धा आपल्या सुनबाईसोबत परीक्षा केंद्रावर पोहोचले होते.
अनेकांना वाटेल की सुनबाई परिक्षेला बसल्यामुळे तिला सोडण्यासाठी देशिंगे आले असतील, परंतु प्रत्यक्षात सुनबाईच आपल्या सासऱ्यांना परिक्षा केंद्रावर सोडण्यासाठी आल्या होत्या. देशिंगे यंदाही बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. गेल्या वर्षीही त्यांनी बारावीची परिक्षा दिली होती, परंतु तीन विषय राहिल्याने ते या वयातही पुन्हा जिद्दीने पदवी मिळवण्यासाठी कशाचीही तमा न बाळगता परीक्षेस बसले आहेत. नापास झाल्यामुळे न खचता वार्धक्यातही परिक्षा देण्याची जिद्द बाळगणाऱ्या देशिंगे यांनी परिक्षेत नापास झाल्याने आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.
दरम्यान, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक नगरसेवक तौफिक मुल्लाणी हेही त्यांची कन्या कुलसूमसोबत या केंद्रावर आले होते, त्यांना उत्सुकता वाटली म्हणून त्यांनी चौकशी केली. तेव्हा देशिंगे हे त्यांच्या सूनबाईसाठी नव्हे तर ते स्वत:च बारावीची परिक्षा देण्यासाठी तेथे आले होते असं त्यांना समजलं.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.