बापाच्या डोक्यावरचं हमालीच ओझं पोरीनं उतरवलं; MPSC परीक्षेत रेश्माचे घवघवीत यश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपला बाप हमालीचे काम करत असल्याने त्याच्या डोक्यावरचं ओझं आपण उतरवायचंच अशी मनाशी मुलीनं जिद्द केली. आणि रात्रंदिवस अभ्यास करत MPSC परीक्षा देत राज्यात पहिला क्रमांक मिळवत यश मिळवलं. हि यशोगाथा आहे कोल्हापूरच्या हमालाच्या लेकीची. रेश्मा बाजीराव ऱ्हाटोळ या तरुणीनं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा मार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षेचे यश मिळविले आहे. रेश्मानं MPSC परीक्षेत ओबीसी महिलांच्या गटात राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला आहे. पाहूया तिची यशोगाथा…

गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाला. या परीक्षेत ग्रामीण भागातील, प्रतिकूल परिस्थितीशी झगडा करुन अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवलं. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातल्या हमालाची मुलगी रेश्मा हिने राज्य उत्पादन शुल्क परीक्षेत यश मिळवत दुय्यम निरीक्षक होण्याचा बहुमान पटकावित इतिहासच रचला. तिने ओबीसी महिलांच्या गटात राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला.

प्राथमिक शिक्षणापासून ते बी.ई. मेकॅनिकलची पदवी

रेश्मानं जोगेवाडी गावातच प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर माध्यमिक शिक्षण तळाशी येथील शाळेत तर बिद्रीमध्ये बारावीपर्यंतचं शिक्षण घेतलं.मेकॅनिकल या ब्रांचमधील डिप्लोमाची पदवी पॉलिटेक्निक कॉलेज, कोल्हापूर येथे प्राप्त केली. तर डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात तिने बी.ई. मेकॅनिकल ही इंजिनिअरिंगची पदवी घेतली. रेश्मानं कॉलेजात शिकत असतानाच सरकारी अधिकारी होण्याचं ध्येय निश्चित केलं.

 reshma rhatol

अपयशाने खचून गेली नाही

रेश्माने बीईचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एमपीएससी परीक्षेसाठी पूर्ण वेळ देण्याचा निर्णय घेतला. तिने खूप अभ्यासही केला. मात्र, काही परीक्षांमध्ये अगदी थोड्या गुणांनी तिला अपयश आले. अपयशातून ती खचून गेली नाही. तिने पुन्हा अभ्यास सुरू ठेवला. आणि त्यातूनच आता राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परिक्षेत यश मिळवले.

रेश्मा बाजीराव ऱ्हाटोळ

हमाली करून वडिलांनी पोरीला शिकवलं

रेश्माचे वडील बाजीराव ऱ्हाटोळ हे भोगावती साखर कारखान्यात हमालीचे काम करतात. रेश्माला आणि तिच्या भावांना संपूर्ण शिक्षण पूर्ण करू देताना वडिलांनी खूप कष्ट घेतले आहेत. पैशाची कोणतीही कमतरता न जाणवू देता त्यांनी रेश्माला सर्व बाजूंनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता तिच्या यशाने त्यांची छाती अभिमानाने फुलून गेली आहे.

reshma

स्वतः हमाल असूनही वडिलांनी मुलांना दिले उच्च शिक्षण

हमाली करत असून देखील बाजीराव ऱ्हाटोळ यांनी एका मुलाला आयटीआय, तर दुसऱ्या मुलाला बीएस्सी पर्यंत शिकवले आहे. आता, रेश्मानं राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षेत ओबीसी महिलांमधून राज्यात प्रथम क्रमांक पटकावून बाजी मारली आहे.