कोल्हापूर प्रतिनिधी । कोल्हापुरात रस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. रस्त्यांमध्ये खड्डेच खड्डे असल्यामुळे नागरिकांना वाहन चालवताना प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे. या प्रश्नासाठी वारंवार मागणी करण्यात आली. तसेच वेळोवेळी यासाठी निदर्शनेदेखील करण्यात आली. मात्र प्रशासनाकडून अदयाप हि ठोस पाऊले उचलले जात नाहीत. रस्त्यांच्या याच प्रश्नावरून आता ‘मनसे’ आक्रमक झाली आहे.
अतिवृष्टी आणि महापुरामुळे कोल्हापूरातील शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली. त्याबाबत महापालिका प्रशासनाकडून कोणत्याच उपाययोजना केल्या जात नसल्याच्या निषेधार्थ आज मनसेच्या वतीने महापालिकेच्या विरोधात अनोखे आंदोलन करण्यात आले. आज त्यांच्याकडून चक्क म्हशींना सोबत घेऊन हे आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी चौकातून या हटके मोर्चाला सुरवात झाली.
यावेळी कार्यकर्त्यांकडून म्हशींच्या अंगावर निदर्शनाचे आणि मागणीचे फलक लावण्यात आले होते. यावेळी ‘महानगरपालिकेने तात्काळ उपाययोजना करावी, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करू’ असा इशारा राजू जाधव यांनी दिला. सध्या ह्या अनोख्या आंदोलनाची चांगलीच चर्चा जिल्हाभर रंगली आहे.