कोल्हापूर प्रतिनिधी : शिवसेना-भाजपा वेगळे होऊन सेना आघाडी सोबत गेल्यास त्याचा सर्वाधिक फायदा कोल्हापूर महानगरपालिकेला होणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेत शिवसेनेला सोबत घेऊन ‘आघाडी’ने सत्ता स्थापन केली आहे. हाच कोल्हापुरी पॅटर्न आता राज्यात आकाराला येत आहे. गेल्या ४ वर्षांपासून कोल्हापूरात भाजपा – ताराराणी आघाडीला बाजूला ठेवून काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना सत्तेत आहेत. त्यामुळे शिवसेनेने दोन्ही काँग्रेससोबत सत्तास्थापन केल्यास अप्रत्यक्षरीत्या ही सत्तास्थापना कोल्हापूर पॅटर्नचाच पुढचा टप्पा म्हणावा लागेल.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना म्हणजे पर्यायाने भाजपाला बाजूला सारून या तिन्ही पक्षांनी एकत्रित येऊन केलेल्या सत्ता स्थापनेचा फटका राज्य सरकारकडून निधी मिळवण्यास झाला होता. आता मात्र हे तिन्ही पक्ष सत्तेत असल्याने महापालिकेला निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेच्या राजकारणावर याचा परिणाम होणार असून डिसेंबर मध्ये होणाऱ्या अध्यक्ष पदाच्या निवडीत शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीच्या बाजूने राहणार आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनाही याच बाजूने राहणार असल्याने ‘भाजपा’च्या प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात राज्यातील समिकरणाचा पहिला फटका ‘भाजपा’लाच बसणार आहे.