कोल्हापूर प्रतिनिधी । महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालय क्र. २ शिवाजी मार्केट येथील लिफ्ट गेले वर्ष भरापासून बंद होती. मात्र सदरची लिफ्ट गुरुवार पासून सुरु करण्यात आली. या नुतनीकरण करण्यात आलेल्या लिफ्टचे उद्घाटन आज महापौर ऍ़ड. सौ.सुरमंजिरी लाटकर व उपमहापौर संजय मोहिते यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी महापौर ऍ़ड. सौ.सुरमंजिरी लाटकर यांनी बोलताना ”या लिफ्टचे नुतनीकरण केल्यामुळे वयस्कर नागरिक, कर्मचारी यांना कार्यालयीन कामाकरीता चौथ्या मजल्यापर्यंत जाण्यास मदत होणार आहे. मागील एक वर्षा पासूनचा होत असलेला त्यांना त्रास हा कमी होण्यास मदत होणार आहे” असे सांगितले.
दरम्यान सदरची लिफ्ट जुलै २०१८ पासून बंद होती. या लिफ्टची ६ वेळा निविदा प्रसिध्द करुनही या निविदेस कोणताही प्रतिसादर मिळाला नव्हता. त्यामुळे हि लिफ्ट बंद होती. मात्र आता हि लिफ्ट क्रिस्टल कंपनीने निविदेअंती मंजूरी दराने बसविली असून यासाठी रक्कम रु. १७.२५ लाख खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. दरम्यान यावेळी नगरसेविका सौ.उमा बनसोडे, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, कनिष्ठ अभियंता निवास पोवार, कनिष्ठ अभियंता विद्युत रोहन डावखर, क्रिस्टा इलेव्हेटर्स इंडिया प्रा.लि.चे महेश सुर्यवंशी आदी मान्यवरांसह अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.