कोल्हापूर प्रतिनिधी । कोल्हापुरातील शाहू मैदान ते नंदगाव या मार्गावरून एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या शेकडोंच्या घरात आहे. तसेच अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेरगावी जावं लागतं. मात्र गावात बसचं येत नसल्याने या विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आगारप्रमुखाच्या कार्यालयातच कॉलेज भरवत अनोखं आंदोलन केलं आहे. संभाजी ब्रिगेडच्या पुढाकाराने हे आंदोलन करण्यात आलं.
शाहू मैदान ते नंदगाव हा मार्ग कोल्हापूर शहराची दक्षिणेची हद्द संपल्यानंतर लागूनच असल्याने या मार्गावर नंदगाव, वडगाव तसेच गिरगाव गावांमधील भाजीपाला विकणाऱ्या तसेच महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शेकडोच्या घरात आहे. असे असतानाही एसटीच्या ढिसाळ कारभाराने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
याचा सर्वाधिक फटका गिरगावमधील महाविद्यालयीन तरुण तरुणींना बसत होता. त्यामुळे संतापलेल्या गिरगावमधील महाविद्यालयीन तरुणांनी संभाजीनगर बसस्थानकात जाऊन अनोखे आंदोलन केले. आगार व्यवस्थापक खाडे यांनी आंदोलनाची दखल घेत गिरगावसाठी विशेष बससह महाविद्यालयीन वेळेत दोन बस सोडण्याची ग्वाही दिली. तेव्हा कुठे विदयार्थ्यांनी हे आंदोलन मागे घेतलं.