कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
कोयना धरणाचे गुरूवारी सकाळी 11 वाजता सहा वक्र दरवाजे 9 फुटांने उचलून 49 हजार 300 क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ होवू लागली आहे. कोयना नदीवरील मूळगाव पुलावर दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पाणी आले होते. कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे सांगली शहरातील पाणीपातळी वाढणार आहे.
पाटण तालुक्यातील कोयना धरणात 105 टीमसी साठवण क्षमता आहे. सध्या धरणात 90.42 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला असला तरी थांबलेला नाही, त्यामुळे पाण्याचे नियमन करण्यासाठी गुरूवारी सकाळी सुरू असलेला 5 फुट 6 इंच वरील दरवाजे 9 फुटांवर नेण्यात आले आहेत. सांडवा व पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 33 हजार 45 क्युसेक्स विसर्ग चालू होता त्यामध्ये वाढ करून तो 49 हजार 300 करण्यात आला आहे.
कोयना नदीपात्रात सोडलेल्या पाण्यामुळे कोयना-कृष्णा नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदीकाठी पूरस्थिती निर्माण होत आहे, तर पाटण तालुक्यातील मूळगाव पूल पाण्याखाली गेलेला आहे.