कृष्णा कारखाना निवडणूक : पहिल्याच दिवशी 6 जणांचे अर्ज दाखल तर 127 अर्जाची विक्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या आणि सातारा, सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या शिवनगर (रेठरे) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी 6 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर सुमारे 127 उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. उद्या बुधवारी 26 मे रोजी शासकीय सुट्टी असल्याने इच्छुकांना अर्ज भरता येणार नाहीत.

सातारा जिल्ह्यातील कराडसह सांगली जिल्ह्यातील कडेगाव, पलूस, शिराळा आणि वाळवा असे पाच तालुक्याचे कार्यक्षेत्र असणाऱ्या यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाना निवडणुकीस मंगळवारपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. मंगळवारी पहिल्याच दिवशी सत्ताधारी डॉ. सुरेश भोसले गटाकडून विद्यमान संचालक धोंडीराम जाधव यांनी वडगाव हवेली – दुशेरे गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर याच गटातून कुसुर येथील विश्वास आत्माराम शिंदे, विंग येथील तानाजी पांडुरंग खबाले आणि कोडोली येथील गजानन सुभाष जगताप यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

त्यामुळे पहिल्याच दिवशी कारखान्याच्या वडगाव हवेली – दुशेरे सर्वाधिक चार उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तर अन्य दोन उमेदवारी अर्ज रेठरे हरणाक्ष – बोरगाव आणि रेठरे बुद्रुक – शेणोली या गटातून दाखल करण्यात आले आहेत. वाळवा तालुक्यातील बहे गावचे संतोष भगवान दमाने यांनी तर रेठरे बुद्रुक येथील महेश भास्कर कुलकर्णी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पहिल्याच दिवशी सुमारे 127 उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर यांनी दिली आहे.