कृष्णा कारखान्यांच्या सत्ताधाऱ्यांविरोधात घाटावर रान पेटले! सभासदांकडून अक्रियाशील यादीची होळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधारी गटाने कडेगाव आणि खानापूर तालुक्यातील 1 हजार 193 सभासदांना अक्रियाशील ठरवल्याने घाटमाथ्यावर संतापाची लाट उसळली आहे. वांगी या गावात सभासदांनी सत्ताधाऱ्यांचा निषेध करत सभासद यादीची होळी केली आहे. सभासदांना अक्रियाशील ठरवण्याचा विषय घाटमाथ्यावर चांगलाच गाजत आहे. त्याचे पडसाद घाटावरच्या इतर गावातही उमटतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

कराड, वाळवा, कडेगाव आणि खानापूर या तालुक्यात कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. आजवरच्या कारखाना निवडणुकीत घाटावरच्या सभासदांनी निर्णायक भूमिका बजावली आहे. आता निवडणूकीच्या तोंडावर घाटावरच्या 1, 193 सभासदांना अक्रियाशील ठरवले आहे. याचा संताप व्यक्त करत वांगी येथे भास्कर जाधव, प्रमोद पाटील, माणीक मोरे, रमेश एडके, सतीश तुपे, शामराव हुबाले, आबा शिंदे, गोरखनाथ औंधे यांनी सभासद यादीची होळी केली आहे.

याबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे गोरखनाथ औंधे म्हणाले,”घाटावरच्या सभासदांना सत्ताधारी लोकांनी नेहमी वाईट वागणूक दिली आहे. गेल्या पाच वर्षात उसतोडीला टोळ्या दिलेल्या नाहीत. टोळ्या नसल्याने ऊस घालवता आला नाही. एकीकडे ऊसतोडीला टोळी द्यायची नाही आणि दुसरीकडे ऊस घालवला नाही म्हणून सभासदांना अक्रियाशील ठरवायचे हा दुटप्पीपणा सुरू आहे. याचा परिणाम आगामी काळात दिसेल,”असा इशारा त्यांनी दिला.

प्रमोद पाटील म्हणाले,”घाटावरच्या सभासदाशी आजवर सत्ताधारी सूडबुद्धीने वागत आले आहेत. आता चक्क सभासदांना अक्रियाशील ठरवून त्यांनी सूडबुद्धीचा कळस गाठला आहे. घाटावरच्या लोकांना अशी वागणूक देण्याचे कारण म्हणजे या लोकांनी कारखान्यातील चुकीच्या गोष्टीना विरोध करत परिवर्तनाचा कौल दिला आहे. आताही घाटावरचे सभासद सत्ताधारी मंडळीच्या कारभारावर चिडून आहेत. त्यांना ही चीड व्यक्त करायची संधी मिळू नये म्हणून त्याना अक्रियाशील ठरवले आहे.”असा आरोप त्यांनी केला.

कृष्णाच्या सभासदांना अक्रियाशील ठरवण्याच्या मुद्द्यावर शेतकरी संघटनाही सभासदांच्या बाजूने लढ्यात उतरणार आहेत. लवकरच याबाबत सर्व शेतकरी संघटनाची बलवडी येथे बैठक आयोजित करण्यात येणार असून त्या बैठकीत पुढील रणनीती ठरणार आहे.’असे संघटनेच्या प्रतिनिधीनी सांगितले.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment